राष्ट्रवादी संपलीय, आता विरोधकांचे डिपाॅजिट राहणार नाही – आमदार लक्ष्मण जगताप
पिंपरी |महाईन्यूज|
पिंपरी-चिंचवड आणि भोसरी मतदारसंघात महायुतीचेच उमेदवार निवडून येणार आहेत. माझ्यासह युतीच्या विरोधात त्याचे उमेदवारही उभे करता आले नाहीत. त्यामुळे पिंपरी-चिंचवडमधून राष्ट्रवादी संपली असून आता विरोधकांचे डिपाॅजिट ही राहणार नाही, असा इशारा चिंचवड महायुतीचे उमेदवार आमदार लक्ष्मण जगताप यांनी पत्रकारांशी बोलताना दिला.
भाजप-शिवसेनेचे महायुतीच्या नेत्यांची आज (बुधवारी) आकुर्डीत बैठक झाली. त्यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत जगताप बोलत होते. यावेळी शिवसेना खासदार श्रीरंग बारणे, खासदार अमर साबळे, भोसरीचे उमेदवार महेश लांडगे, पिंपरीचे उमेदवार गौतम चाबुकस्वार, पीसीएनटीडीएचे अध्यक्ष सदाशिव खाडे, आरपीआयच्या नेत्या चंद्रकांत सोनकांबळे, खादी व ग्रामविकास मंडळाचे उपसभापती हेमंत तापकीर, सभागृह नेते एकनाथ पवार, शिवसेना जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे, शरहप्रमुख योगेश बाबर, उमा खापरे, शैला मोळक, राजेश पिल्ले, बाबू नायर, महेश कुलकर्णी, अमोल थोरात उपस्थित होते.
पिंपरी, चिंचवड आणि भोसरीतून महायुतीचे उमेदवार मोठ्या फरकाने विजयी होतील असे सांगून लक्ष्मण जगताप म्हणाले, शहरात केलेली विकासकामे आणि भविष्यातील शहराचे नियोजन करुन आम्ही निवडणुकीला सामोरे जात आहोत. जनता विकासकामे करणा-यांना पसंती देईल.
भोसरीचे उमेदवार महेश लांडगे म्हणाले, लोकसभेला देखील विरोधकांनी भाजप विरोधात मोठ बांधली होती. परंतु, ती यशस्वी झाली नाही. आताही तेच होणार आहे. जनता विकास कामे करणा-यांच्या पाठिशी उभी राहते. आम्ही शहरातील विकास कामाच्या जोरावर जनतेसमोर जात आहोत.
पिंपरीचे उमेदवार गौतम चाबुकस्वार म्हणाले, बंडखोरांना जनता थारा देणार नाही. विरोधकांचे डिपॉझीट’ देखील राहणार नाही. महायुतीच्या तीनही उमेदवारांचा विजय निश्चित आहे.