राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केली गुटख्याची होळी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/03/1-4-1.jpg)
पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी होळी सणानिमित्त आरोग्याविषयी जनजागृती करण्यासाठी तंबाखु, सिगारेट, बिडी, गुटखा, पानमसाला यांची प्रतिकात्मक होळी करून समाजाला संदेश देण्यात आला.
पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी युवती संघटना व सामाजिक न्याय महिला विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने पिंपरी-चिंचवड शहरातील विद्यार्थ्यांमध्ये व्यसनमुक्तीसाठी व धुम्रपानाची प्रतिकात्मक होळी अजंठानगर येथे आज सोमवारी (दि. 9) शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच वर्षा जगताप, गंगा धेंडे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.
राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे म्हणाले की, आजचा तरुण दारूचे व्यसन करून वाहन चालवित असल्यामुळे अपघात होतात. त्यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. व्यसनामुळे कर्करोगांसारख्या महाभयंकर रोगांना तरुण सामोरे जात आहेत. श्वसनाचा त्रास, फुफ्फूसाचा विकार, मेंदूवरील संतुलन जाणे, असे अनेक रोग होण्याची शक्यता असते. त्यामुळे आजची तरूण पिढी भविष्याचा कोणताही विचार न करता व्यसनाच्या अधीन गेल्याचे दिसते. ही गंभीर बाब आहे.
वर्षा जगताप म्हणाल्या, आजच्या तरुण पिढीमध्ये तसेच शालेय विद्यार्थ्यांमध्ये व्यसनाचे प्रमाण फार मोठ्या प्रमाणात वाढलेले दिसते. विद्यार्थी अभ्यासात लक्ष न देता व्यसनाधीन होऊन अभ्यासापासून वंचित राहत आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने गुटख्याची होळी करुन प्रबोधनाचा संदेश देत आरोग्याविषयी जनजागृती करण्यात आली.
यावेळी पक्ष प्रवक्ते फजल शेख, कविता ताठे, ऋतुजा बिराजदार, श्वेता पाटे, शलाका बनगर, हिना आत्तार, भोसरी विधानसभा अध्यक्षा मनिषा गटकळ, महिला कार्याध्यक्षा पुष्पा शेळके, प्रदीप गायकवाड, रशिद सय्यद, रविराज साबळे, राहुल चौधरी, नवनाथ साबळे, रुपेश धेंडे, राहुल साखळे, पल्लवी साखळे इत्यादींसह मान्यवरांसह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.