राष्ट्रवादीचे संजोग वाघेरे स्वतःचे महत्व वाढवून घेण्यासाठी अफवा पसरवितात
पिंपरी, (महा-ई-न्यूज) – पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल भाजपच्या पथ्यावर पडल्याने आमदार लक्ष्मण जगताप, नेते आझम पानसरे आणि भाजप संलग्न आमदार महेश लांडगे हे राष्ट्रवादीत (स्वगृही) परतण्याची चर्चा सुरू आहे. परंतु, महापालिकेतील भाजप पदाधिकारी या नेत्यांच्या बाबतीत आत्मविश्वास बाळगून आहेत. तिनही नेते भाजप सोडून इतर कोणत्याही पक्षात जाणार नसल्याचा त्यांना विश्वास आहे. मात्र, राष्ट्रवादीचे पदाधिकारी स्वतःचे महत्व वाढवून घेण्यासाठी भाजपचे नेते आमच्या संपर्कात असल्याचे सांगून कार्यकर्त्यांची दिशाभूल करत आहेत, असे सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी सांगितले आहे.
मागील विधानसभा निवडणुकीत आमदार लक्ष्मण जगताप यांनी भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढविली. तर, महेश लांडगे यांनी अपक्ष उभा राहून भोसरी विधानसभेवर विजय मिळविला. नंतर पालिका निवडणुकीच्या तोंडावर ज्येष्ठ नेते आझम पानसरे यांनी देखील भाजपत उडी घेतली. हे तीन नेते एकाच पक्षात आल्याने तिघांचे शहरावर वर्चस्व कायम राहिले आहे. परंतु, नुकताच पाच राज्यांच्या विधानसभेचा निकाल भाजपच्या विरोधात लागल्याने या तिनही नेत्यांच्या हालचालींवर राजकीय क्षेत्रातून संशय घेतला जात आहे. त्यामुळे आमदार जगताप आणि लांडगे यांना माध्यमांसमोर येऊन पक्षांतर करणार नसल्याबाबत खुलासा करावा लागला आहे. तरी, त्यांच्या भूमिकेबाबत राजकीय जाणकारांनी साशंकता व्यक्त केली आहे.
त्यातच राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी देखील प्रसार माध्यमांना जगताप, पानसरे आणि लांडगे यांच्या पक्ष बदलाच्या सवयींबाबत भाष्य केले आहे. सत्ता ज्या पक्षाकडे झुकेल त्या पक्षात हे नेते जाणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे जगताप, लांडगे आणि पानसरे आगामी लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर स्वतःचे राजकीय अस्तित्व टिकविण्यासाठी पक्ष बदणार असल्याचे वाघेरे यांनी ठणकाऊन सांगितले आहे. परंतु, महापालिकेतील भाजप पदाधिकारी या तिनही नेत्यांबाबत कमालीचा आत्मविश्वास बाळगून आहेत. तिनही नेते कोणत्याही पक्षात जाणार नसल्याचे स्पष्टीकरण पक्षनेते एकनाथ पवार यांनी दिले आहे. राष्ट्रवादीचे संजोग वाघेरे यांनी स्वतःचे महत्व वाढवून घेण्यासाठी आमदार जगताप, पानसरे आणि लांडगे यांच्या बाबतीत असे विधान करून समाजात त्यांच्या विषयीची अफवा पसरविण्याचे काम केले आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.