रावेत स्मशानभूमी वाद पेटणार; आयुक्त श्रावण हर्डिकर अडचणीत
स्मशानभूमी जिथे आहे तिथेच राहू द्या, वाल्हेकरवाडी नागरिकांचा आयुक्तांना घेराव
पिंपरी|महाईन्यूज|प्रतिनिधी|
रावेत येथील सेक्टर क्रमांक 32 मधील स्मशानभूमीला रावेतच्या स्थानिक नगरसेवकांसह नागरिकांच्या दबावापोटी आयुक्त श्रावण हर्डिकर स्थलांतर करुन कामास स्थगिती दिली. मात्र, वाल्हेकरवाडीच्या नागरिकांनी स्मशानभूमी जिथे आहे तिथे राहू द्या, त्या स्मशानभूमीचे काम पुर्ण करा, आपण घेतलेल्या निर्णयाचा फेरविचार करावा, अशी मागणी वाल्हेकरवाडीच्या नागरिकांनी केली आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने रावेत येथील सेक्टर क्रमांक 32 मधील जागेवर स्मशानभुमीचे आरक्षण होते. त्यानुसार स्मशानभूमीच्या बांधकामास सुरूवात झाली आहे. त्याचे 60 टक्के काम पुर्ण झाले आहे. त्यावर प्रभाग क्रमांक 16 मधील नागरिकांसह स्थानिक नगरसेवकांनी स्मशानभूमीला विरोध केला. वारंवार उपोषण, आंदोलने केले. लोकवस्तीनजीक स्मशानभूमी नको, सर्व धूर आमच्या घराकडे येतोय, आरोग्याच्या समस्या निर्माण होतील, त्यामुळे स्मशानभूमी अन्यत्र स्थलांतर करावी, अशी मागणी केली.
त्यावर नुकतीच आयुक्त श्रावण हर्डिकर यांनी नागरिकांसोबत सर्वपक्षीय एक बैठक घेतली. त्यानूसार सदरील कामाला स्थगिती देत, स्मशानभूमी अन्यत्र हलविण्याबाबत निर्देश दिले होते. आयुक्तांच्या या निर्णयाला वाल्हेकरवाडी येथील नगरसेवकांसह नागरिकांनी विरोध दर्शविला आहे. स्मशानभूमी झालीच पाहिजे, ती जिथे आहे त्याच ठिकाणी का पुर्ण करा, अशी मागणी केली. यावर आयुक्तांच्या अडचणी वाढल्या असून फेरविचार करण्याचा निर्णय घेतला आहे.