breaking-newsTOP Newsपिंपरी / चिंचवड

रामदास तांबे यांनी बैठकीची माहिती का दिली नाही ?, स्थायीत नगरसेवकांचा संताप

  • आमच्या प्रभागात पाण्यासंदर्भात समस्या नाहीत काय ?
  • सह शहर अभियंता तांबे याना सुनावले खडेबोल

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

उपमहापौरांच्या एकाही प्रश्नाचे समाधानकारक उत्तर देता न आल्याने काल बैठकीत पाणी पुरवठा विभागाचे सह शहर अभियंता रामदास तांबे यांना नामुष्की सहन करावी लागली. आज देखील स्थायी समितीच्या बैठकीत तांबे यांच्यावर सदस्यांनी सडकून टिका केली. पाणी पुरवठ्यासंदर्भात घेतलेल्या बैठकीची माहिती आम्हाला का कळवली नाही ?, असा जाब विचारत नगरसेवकांनी तांबे यांना भरसभेत घाम फोडला.

पिंपरी-चिंचवड शहरामध्ये गेल्या सहा महिन्यांपासून गडूळ पाणी पुरवठा होत आहे. याची कारणे विचारण्यासाठी उपमहापौर तुषार हिंगे यांनी काल पाणी पुरवठा विभागातील अधिका-यांची बैठक घेतली. त्यात सह शहर अभियंता तांबे यांना उपमहापौरांच्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे देता आली नाहीत. त्यामुळे उपमहापौरांनी भर बैठकीत तांबेंचा जाहीर निषेध करत सभागृहाचा त्याग केला. या बैठकीची माहिती आम्हाला का दिली नाही ?, असा जाब विचारत आज स्थायी समिती सभेत नगरसेवकांनी तांबे यांना टार्गेट केले. आमच्याही प्रभागात गडूळ पाणी येते, पाणी पुरवठा वेळेत होत नाही, अशा तक्रारी मांडत नगरसेवकांनी तांबे यांना खडेबोल सुनावले.

शिवसेनेचे नगरसेवक राहूल कलाटे म्हणाले, पवना धरणात शंभर टक्के पाणीसाठा आहे. जर धरणात पुरेसे पाणी असेल तर नागरिकांना पूर्णवेळ पाणी पुरवठा का करत नाही ?, बैठ्या घरांना पाण्याची मोठी समस्या सहन करावी लागते. साठवन क्षमता नसल्यामुळे त्यांना दररोज पाणी पुरवठा होणे नितांत गरजेचे आहे. पूर्णवेळ पाणी पुरवठा केव्हा करणार ? असा सवाल त्यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांना विचारला. त्यावर आयुक्तांनी अद्याप तरी त्यासंदर्भात निर्णय घेणे शक्य नसल्याचे कलाटे यांना खुनावून सांगितले.

ज्येष्ठ नगरसेविका झामाबाई बारणे म्हणाल्या, पाणी पुरवठा हा संपूर्ण शहरातील नागरिकांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. यासंदर्भात बैठक घेत असताना अन्य नगरसेवकांना याची माहिती का दिली नाही ?, आमच्याही प्रभागात गडूळ पाणी पुरवठा होत असल्याच्या समस्या आहेत. बिर्ला रुग्णालय भागातील पाण्याच्या टाकीमधून क्लोरिनयुक्त पाणी पुरवठा होत नाही. गडूळ पाणी सोडले जाते. स्वच्छ पाणी पुरवठा केव्हा करणार आहात ?. प्रत्येकवेळी माहिती घेऊन सांगतो, दोन दिवसांनी सांगतो, नंतर सांगतो अशी टोलवाटोलवीची उत्तरे दिली जातात. प्रत्यक्षात मात्र माहिती न देता नगरसेवकांचा अवमान केला जातो, अशा शब्दांत तांबे यांना सडकून काढले.

सभापती संतोष लोंढे म्हणाले, शहरातील सर्व प्रभागांमध्ये स्वच्छ पाणी पुरवठा होईल याची खबरदारी घेण्यात यावी. ज्या ठिकाणी पाण्याच्या समस्या आहेत. त्याठिकाणी स्वतः जाऊन पाहणी करावी. तेथील समस्या तातडीने सोडवावी, असे आदेश लोंढे यांनी दिले. त्यावर तांबे यांनी गंजलेले पाईपलाईन दुरूस्तीचे काम पावसाळा संपल्यानंतर सुरू करण्यात येणार असल्याचे सांगत पळवाट शोधली.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button