राज्य सरकारचे आदेश धुडकाऊन स्थायी समितीची कोट्यवधींच्या खर्चासाठी घिसाडघाई
![Mahalunge police have arrested three people, including a guard, for stealing six bearings of a gear box from a company. A case has been registered against the BJP corporator of Pimpri-Chinchwad Municipal Corporation along with her husband and they are absconding.](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/11/pcmc-bjp-1-696x348.jpg)
- कोविड काळात रस्ते, शाळा बांधकामांचे विषय आक्षेपार्ह
- विषय पत्रिकेवर कोट्यवधी रुपये खर्चाचे विषय घुसडले
पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी
कोरोना विषाणुसदृष्य परिस्थितीत राज्यातील सर्व महापालिकांना एकूण निधीपैकी 67 टक्के निधी शिल्लक ठेवून केवळ 33 टक्के निधी कोविड 19 संबंधीत कामांवर खर्च करण्याचे निर्देश राज्य सरकारने दिले आहेत. हे निर्णय धाब्यावर बसवून पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती सभेत रस्ते आणि शाळेचे बांधकाम आशा कामांचे प्रस्ताव घुसडून त्यावर खर्च होणा-या कोट्यवधी रुपयांना खुलेआम मंजुरी दिली जाणार आहे. कोरोनाच्या काळात नागरिकांचा जीव टांगणीला लागलेला असताना सुध्दा सत्ताधारी भाजप आणि पालिका प्रशासनाची कोट्यवधी रुपये खर्च करण्यासाठी घिसाडघाई सुरू आहे.
पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोनाचा अक्षरषः उद्रेक झाला आहे. दररोज 500 हून अधिक रुग्ण सापडत असताना नागरिकांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. गेल्या दोन दिवसांत तर बाधित रुग्णांचा आकडा 1000चा टप्पा ओलांडून पलिकडे गेला आहे. त्यामुळे आता लोकांना स्वतःच्या घरात सुध्दा असुरक्षित वाटू लागले आहे. नागरिकांच्या जीवाला धोका होऊ नये, यासाठी राज्य सरकार युध्द पातळीवर प्रयत्न करत आहे. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी महापालिकांना विकासनिधीतील केवळ 33 टक्के निधी कोरोनाशी संबंधीत विकास कामांवर खर्ची घालावा. उर्वरीत 67 टक्के निधी हा शिल्लक ठेवण्यात यावा, असे राज्य सरकारने राज्यातील सर्व महापालिकांना आदेश दिले आहेत. असे असताना पिंपरी-चिंचवड महापालिकेत विकास कामांच्या नावाखाली कोट्यवधी रुपये खर्चाचे विषय स्थायी समितीच्या विषयपत्रिकेत घुसडले जात आहेत.
उद्या होणा-या स्थायी समिती सभेत स्थापत्य विभागाशी संबंधीत प्रभाग 25 ताथवडे येथील जीवननगरकडून मुंबई-बेंगलोर महामार्गाकडे जाणारा 24 मीटर रुंद डीपी रस्ता विकासित करण्याचा विषय अजेंड्यावर घेण्यात आला आहे. हा रस्ता विकसित करण्यासाठी तब्बल 24 कोटी 74 लाख एवढी रक्कम खर्ची पडणार आहे. प्रभाग क्रमांक 25 वाकड येथे आरक्षण क्रमांक 4/23 मध्ये शाळेची इमारत बांधण्यात येणार आहे. या कमासाठी 23 कोटी 67 लाख रुपये खर्चाची निविदा राबविण्यात आली आहे. याच प्रभागातील ताथवडे येथील शनीमंदिराकडून मारुंजी गावाकडे जाणारा 30 मीटर रुंद डीपी रस्ता विकसित करण्यात येणार आहे. त्यासाठी सुध्दा 24 कोटी 34 लाख रुपयांच्या खर्चाची निविदा घेतली आहे. तसेच, प्रभाग 25 मध्येच रस्ते कॉंक्रिटीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी 36 कोटी 37 लाख एवढ्या खर्चाचा विषय समोर आणला आहे. या विषयांना उद्या होणा-या स्थायी समिती सभेत सभापती संतोष लोंढे मंजुरी देणार आहेत.
सत्ताधारी भजाप आणि राष्ट्रवादीचे साटेलोटे
राज्यात महाविकासआघाडीची सत्ता आहे. तर, पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपची एकहाती सत्ता आहे. पालिकेतील सत्ताधारी भाजपच्या चुकीच्या कामाला अटकाव घालण्याचे काम विरोधक म्हणून राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी करायला हवे. मात्र, राष्ट्रवादीचे नगरसेवक विरोध करण्याचे सोडून भाजप पदाधिका-यांच्या हातात हात घालून कारभार करत आले आहेत. राज्य सरकारचे सक्त आदेश असताना उद्या या विषयांना स्थायी समितीमधील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सदस्यांना विरोध करावा लागणार आहे. परंतु, हा विरोध होणार, की या विषयांत हात ओले करून विषय मंजुरीला समर्थन दिले जाणार, हे उद्याच्या स्थायी समिती सभेनंतर स्पष्ट होणार आहे.