रहाटणी : मनपा शाळेच्या विद्यार्थ्याची आंतरराष्ट्रीय ‘किक बॉक्सिंग’ स्पर्धेसाठी निवड
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/02/boxing.jpg)
पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या रहाटणी येथील प्राथमिक शाळेतील करण गायकवाड या विद्यार्थ्याची आंतरराष्ट्रीय किक बॉक्सिंग स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली आहे. यानिमित्त रहाटणीतील न्यू सिटी प्राईड स्कूलचे संस्थापक अध्यक्ष अरुण चाबुकस्वार व सामाजिक कार्यकर्ते भगवान गोडांबे यांनी त्याचे अभिनंदन केले.
यावेळी प्रभारी मुखाध्यापिका ललिता हिवरेकर, मुख्यध्यापक दत्ताजी पाटील व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी, पालक उपस्थित होते. करण गायकवाड हा महापालिकेच्या रहाटणीतील प्राथमिक शाळेत चौथीचा विद्यार्थी आहे. तो किक बॉक्सिंगचा खेळाडू आहे. त्याची या खेळाच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली आहे. ९ ते १३ फेब्रुवारी दरम्यान नवी दिल्ली येथे ही स्पर्धा होणार आहे.
“या जिगरबाज खेळाडूनी कठोर मेहनत, जिद्दीद्वारे आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये पहिले पाऊल टाकले आहे. त्याने मिळवलेले यश मोठे आहे. त्याच्या श्रेयाला आई-वडिलांसह वर्गशिक्षकांचे मोलाचे योगदान आहे.” अशी भावना भगवान गोडांबे आणि न्यू सिटी प्राईड स्कूलचे संस्थापक अध्यक्ष अरुण चाबुकस्वार यांनी व्यक्त केली.
सूत्रसंचालन सुधाकर दाडंगे यांनी केले. संजय इंदलकर यांनी आभार मानले.