रमाबाईंचा त्यागपूर्ण संघर्ष अनन्यसाधारण आहे – सुजाता ओव्हाळ
![Ramabincha Abandoned Struggle is an ordinary one - Sujata Ovha](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/02/ramai-jayanti.jpg)
– शहरातील विविध पक्ष, संघटनेतर्फे रमाबाईंना अभिवादन
पिंपरी | प्रतिनिधी
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अधिकार विरहित समाजाला त्यांचे न्याय्य हक्क मिळवून देण्याकरीता लढा उभा केला. त्यानी उभारलेल्या लढ्यासह त्यांच्या सामाजिक, राजकीय जीवन प्रवासात पत्नी रमाई आंबेडकर यांनी मोलाची साथ दिली. त्यानी केलेला त्यागपूर्ण संघर्ष अनन्यसाधारण आहे, असे प्रतिपादन भारतीय बौद्ध महासभेच्या केंद्रीय शिक्षिका सुजाता ओव्हाळ यांनी केले.
‘त्यागमूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर यांचे जीवन चरित्र’ या विषयावर त्यांनी आपले विचार मांडले. त्यागमूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर यांची जयंती आज शहरातील विविध संघटनेच्या वतीने उत्साहात साजरी करण्यात आली.
पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या प्रांगणात जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या हस्ते माता रमाई यांच्या प्रतिमेस तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमास महापालिकेचे पक्षनेते नामदेव ढाके, स्थायी समिती सभापती संतोष लोंढे, भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश ओव्हाळ, सरचिटणीस राधाकांत कांबळे, शहर प्रमुख व कार्यक्रमाचे अध्यक्ष बापूसाहेब गायकवाड, आरपीआय महिला आघाडीच्या राज्य सरचिटणीस माजी नगरसेविका चंद्रकांता सोनकांबळे, वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष देवेंद्र तायडे, वंचित बहुजन आघाडी महिला अध्यक्ष लता रोकडे, रिपब्लिकन सेना शहराध्यक्ष धुराजी शिंदे, एमआयएमचे शहराध्यक्ष धम्मराज साळवे, समता सैनिक दलाचे मेजर विनोद कांबळे, सुरेश भालेराव, सुखदेव वाहुळे तसेच सामाजिक कार्यकर्ते विनोद गायकवाड, अंजना कांबळे, आशा सरतापे, रेखा ढेकळे आदींसह नागरिक उपस्थित होते.
महापौर ढोरे यांनी शहरवासियांना माता रमाई आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा दिल्या. समाजहितासाठी लढणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सावली असणा-या रमाईंचा त्याग महत्वाचा आहे. समाजाची आई झालेल्या रमाईंनी प्रत्येक संघर्षात बाबासाहेबांना खंबीरपणे साथ दिली. रमाईंचा जीवनप्रवास सर्वांसाठी दिशादर्शक असल्याचे प्रतिपादन ढोरे यांनी केले,.
सुजाता ओव्हाळ यांनी रमाईचा जीवनपट सर्वांसमोर उलगडला त्या म्हणाल्या, उच्च शिक्षणासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर परदेशात गेले असताना रमाईंनी कौटुंबिक जबाबदारी समर्थपणे पेलली. प्रतिकुल परिस्थितीत कष्ट उपसले. व्यक्तिगत सुखापेक्षा बाबासाहेबांनी चालवलेला समतेचा लढा रमाईंना अधिक महत्त्वाचा वाटला. अनेक खडतर प्रसंगांना सामोरे गेलेल्या रमाईंनी दुःखाची तमा बाळगली नाही. त्यागातून श्रेष्ठत्व निर्माण करणाऱ्या रमाई खऱ्या अर्थाने त्यागमूर्ती ठरतात, असे ओव्हाळ म्हणाल्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा सरचिटणीस राधाकांत कांबळे यांनी तर सूत्रसंचालन शहर सरचिटणीस अशोक सरतापे यांनी केले. आभार शहर उपाध्यक्ष अशोक यादव मानले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी मनोज गजभार, अनुसया कांबळे, मच्छिंद्र कदम, दत्ता गायकवाड, शोभा गायकवाड, शामा जाधव, रमा गायकवाड, पी.जी.भोसले, मिलिंद घोगरे, हौसराव शिंदे, माणिक निसर्गंध, राजेंद्र साळवे, विजय ओव्हाळ, संतोष शिंदे, शेखर गायकवाड, विविध पक्ष संघटनांचे कार्यकर्ते आदींनी परिश्रम घेतले.