यंदा गोविंदांच्या आनंदावर विरजण, दहीहंडी उत्सवाला बंदी, शहरात पोलीस बंदोबस्त
पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू असलेल्या टाळेबंदीत उद्या बुधवारी (दि. 12) होणाऱ्या दहीहंडी कार्यक्रमासाठी पोलिसांकडून कुणालाही परवानगी देण्यात येणार नाही. त्यामुळे शहरातील गोविंदांना यंदा दहीहंडी उत्सवातील आनंदाला मुकावे लागणार आहे.
उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. वरिष्ठ अधिका-यांनी अधिकाऱ्यांना टाळेबंदीची कठोर अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत. विनाकारण घराबाहेर फिरताना आढळल्यास त्या नागरिकांवर देखील पोलीस कारवाई करणार आहेत. त्यामुळे उत्सवाचा आनंद साजरा करणे खूप महागात पडणार आहे.
शहरातील प्रत्येक धार्मिक स्थळांवर पोलीस बंदोबस्त असणार आहे. कृष्ण मंदिरात आरती, भजन करणे तसेच सार्वजनिक ठिकाणी एकत्र जमणे, फटाके फोडणे, मिरवणूक काढणे, प्रतिमा पूजन यांसारख्या कार्यक्रमांना देखील बंदी घालण्यात आली आहे.