मोशीतील प्रस्तावित छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याचे काम वादग्रस्त ठेकेदाराला दिल्याने विरोधकांची टिका
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/06/Screenshot_20200617_131104.jpg)
पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने बो-हाडेवस्ती, मोशी येथे छत्रपती संभाजी महाराज यांचा १०० फुट उंचीचा पुतळा उभारण्यात येत आहे. त्याच्या खर्चास स्थायी समितीने मंजुरी दिली असली तरी, कोरोना महामारीच्या संकटात त्या खर्चास महापालिका आयुक्तांनी परवानगी नाकारली आहे. तर, दुसरीकडे वादग्रस्त ठेकेदाराला काम दिल्याने खर्च वाढण्याची शक्यता असल्याचा आरोप विरोधकांनी केली आहे.
देशातील सर्वांत उंच १०० फूट उंचीचा ब्रॉझचा पुतळा बो-हाडेवस्ती येथील पावणेतीन एकर जागेत महापालिका उभारत आहे. त्यासाठी उभारण्यात येणाऱ्या ४० फूट चौथऱ्याचे काम सध्या सुरु आहे. त्या कामास १२ कोटी ५० लाख खर्चास स्थायी समितीने जानेवारी २०२० मध्ये मंजुरी दिली आहे. त्या कामाला महापालिकेने सुरुवात केली आहे.
संभाजी महाराजांचा पुतळा उभारण्यासाठी ३२ कोटी ६६ लाख खर्चास स्थायी समितीने ३ जूनला मंजुरी दिली. कोरोना महामारीच्या संकट काळात राज्य शासनाने सर्व महापालिकेवर आर्थिक निर्बंध लादले आहेत. अत्यावश्यक असलेल्या भांडवली खर्चासाठी केवळ ३३ टक्के खर्च करण्याची सक्त ताकीद दिली आहे. त्यानुसार आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी या कामाची मंजुरी थांबविली आहे. कोरोनाचे सावट कमी झाल्यानंतर तसेच, राज्य शासनाने आर्थिक निबंध कमी केल्यानंतर हे काम सुरू होण्याची शक्यता आहे. तोपर्यंत हे काम रखडणार आहे.
खर्च शंभर कोटीपर्यंत जाण्याची शक्यता – दत्ता साने
या संदर्भात माजी विरोधी पक्षनेते दत्ता साने म्हणाले की , शहरात संभाजीनगर येथील बर्ड व्हॅली येथे संभाजी महाराजांचा पुतळा असताना नव्या पुतळ्याचा हट्ट सत्ताधाऱ्यांनी धरला आहे. भोसरीतील शीतल बाग पादचारी पुलास ५० लाख खर्च असताना तो वाढवून ७ कोटींवर नेण्यात आला. त्यात महापालिकेचे मोठे नुकसान झाले. ते काम करणाऱ्या वादग्रस्त ठेकेदारला संभाजी महाराज पुतळ्याचे काम दिले आहे. त्यामुळे त्याचा खर्च वाढत नेऊन १०० कोटींपर्यंत जाण्याची शक्यता आहे. त्यातून महापालिकेचे आर्थिक नुकसान होऊन बदनामीस सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे संबंधित ठेकेदारांवर कारवाई करून फेरनिविदा राबवावी, अशी मागणी माजी विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी केली आहे. या प्रकल्पास विरोध नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. या संदर्भात आयुक्त हर्डीकर यांच्याकडून माहिती घेऊन मत प्रदर्शन करू, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे व विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी सांगितले.