मोरवाडी न्यायालयाचे स्थलांतर, नेहरूनगरमधून चालणार कामकाज
![Uttarakhand government's statement is invalid](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/12/hammer-law.jpg)
पिंपरी, (महा-ई-न्यूज) – मोरवाडी न्यायालयासाठी नेहरूनगर येथील अण्णासाहेब मगर क्रिडा संकुलासमोरील वाचनालय आणि दवाखान्यासाठी उभारलेल्या इमारतीची जागा देण्यात आली आहे. पाच वर्षासाठी भाडेतत्वावर ही इमारत देण्यात आली असून दरमहा 8 लाख 77 हजार रुपये एवढे भाडे आकारण्यात येणार आहे.
मोरवाडी येथील न्यायालयाची इमारत न्यायालयीन कामकाजासाठी अपुरी पडत आहे. शासनाने न्यायालयासाठी पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या हद्दीतील मोशी, बो-हाडेवाडी येथील पेठ क्रमांक 14 मधील 6.57 हेक्टर (15 एकर) जागा न्यायसंकुलासाठी मंजूर केली आहे. परंतु, न्यायालयाच्या इमारतीचे बांधकाम सुरु झाले नाही. तथापि, पिंपरी-चिंचवड अॅडव्हेकेट बार असोसिएशनने अजमेरा सोसायटी येथील महापालिका शाळेसाठी बांधलेल्या इमारतीमधील जागेची मागणी केली होती. महापालिकेने देखील जागा देण्याची तयारी दाखविली होती. मात्र, त्याला स्थानिकांनी विरोध केला. त्यामुळे तो प्रस्ताव बारगळला होता.
आता नेहरुनगर येथील अण्णासाहेब मगर क्रीडा संकुलासमोरील जागा न्यायालयासाठी निश्चित करण्यात आली आहे. या जागेवर वाहनतळ, टपाल कार्यालय, वाचनालय, दवाखान्याचे आरक्षण आहे. त्यापैकी दवाखाना आणि वाचनालयाच्या इमारतीचे बांधकाम झाले आहे. वाचनालय आणि दवाखानाच्या इमारतीमध्ये न्यायालयाचे कामकाज चालणार आहे. त्यासाठी 8 लाख 77 हजार रुपये भाडे प्रतिमहिना पाच वर्षासाठी आकारण्यात येणार आहे. याबाबतच्या प्रस्तावाला स्थायी समितीने मंगळवारी (दि. 4) मान्यता दिली आहे.