मोटारीच्या बोनेटमधील नागाला जीवनदान
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/09/0snake_11.jpg)
पिंपरी – तापमानात वाढ झाल्याने निसर्गचक्रात वावरणारे प्राणी मानववस्तीत विसावा घेण्यासाठी भटकत आहेत. अशाच पद्धतीने एक नाग जातीच्या सापाने वाकड-कस्पटेवस्ती येथील अनमोल सोसायटीतील मोटारीत आसरा घेतल्याचे उघडकीस आले. मात्र, सर्पमित्रांना त्याला पकडून नदी किनारी सोडल्याने त्याला जीवनदान मिळाले.
सर्पमित्र ओंकार भुतकर यांना सोसायटीच्या एका बंगल्याच्या पार्किंगमधील मोटारीच्या बोनटमधून साप डोके काढत असल्याबाबत फोन करून व व्हॉट्सऍपवर फोटो पाठवून नागरिकांनी सांगितले. सदर साप विषारी नाग असल्यामुळे ओंकार यांच्यासह सुनील भुतकर व कृष्णा पांचाळ हेही सर्पमित्र घटनास्थळी पोचले. मोटारीचा बोनट उघडून सुमारे दीड तासाच्या प्रयत्नानंतर सर्पमित्रांनी यशस्वीपणे नागाला बाहेर काढून पाणी पाजले. त्यानंतर त्याला पकडून नदी किनारी झाडाझुडपांत सोडण्यात आले. साधारणपणे या नागाची लांबी साडेपाच फूट असल्याचे सर्पमित्रांनी सांगितले.