Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

मेट्रो स्टेशनला पुणेरी पगडीचा आकार देण्यास संभाजी ब्रिगेडचा विरोध

पुणे ( महा ई न्यूज ) – पुणे मेट्रोच्या दोन स्थानकांना पुणेरी पगडीचा आकार देण्यात येणार आहे. डेक्कन आणि संभाजी उद्यानातील स्थानकाला पगडीचा आकार दिला जाणार आहे. मात्र संभाजी ब्रिगेडनं पुणेरी पगडीच्या आकाराला विरोध केला आहे. पुणेरी पगडीचा आकार देऊ नये, अशा मागणीचं निवेदन संभाजी ब्रिगेडनं मेट्रो प्रशासनाला दिले आहे. 

तर पुणेरी पगडीऐवजी छत्रपतींचा जिरेटोप, राजमुद्रा, शिंदेशाही पगडी, फुले पगडी, तुकोबांची पगडी आणि शाहू फेटा या प्रतिकांची स्थानकं उभारण्याची मागणी केली आहे. या माध्यमातून समाजात समता आणि बंधुत्व निर्माण करावं, अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे संतोष शिंदे यांनी केली.

पगडीबरोबरच मेट्रो स्थानकाला महापुरुषांचे नावं देण्याचीही संभाजी ब्रिगेडची मागणी आहे. छत्रपती संभाजी उद्यानातील स्थानकाला छत्रपती संभाजी महाराज मेट्रो स्थानक, डेक्कन जिमखान्याला संत तुकाराम महाराज, शिवाजीनगरला छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वारगेटला राजमाता अहिल्यादेवी होळकर तर नळ स्टॉप – कर्वे रोडला क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले किंवा लहुजी वस्ताद साळवे स्थानकाचं नाव देण्याची मागणी ब्रिगेडनं केली आहे.

संभाजी ब्रिगेडच्या मागण्यांचा मेट्रोच्या बैठकीत निर्णय घेण्यात येणार असल्याचं मेट्रो प्रशासनानं म्हटलं आहे. तर पगडीवरुन तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळं येत्या काळात मेट्रोच्या पुणेरी पगडीवरुन सामाजिक वातावरण ढवळून निघण्याची शक्यता आहे.

 

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button