मुक्त रिक्षा परवाना बंद झाला पाहिजे, अन्यथा तीव्र आंदोलन
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/01/IMG-20200109-WA0222.jpg)
- रिक्षा चालक मालक संघटनेचे नेते बाबा कांबळे यांचा इशारा
- लोणावळ्यात पार पडलेल्या बैठकीत घेतला सामुदायीक निर्णय
पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी
मुक्त रिक्षा परवाना बंद झाला पाहिजे, रिक्षा चालकांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन झाले, लोणावळा येथे होणारी बेकायदेशीर वाहतूक बंद झाली पाहिजे यासह इतर विविध मागण्यांसाठी सरकार दरबारी पाठपुरवठा करून प्रश्न सुटत नाहीत. यामुळे या प्रश्नांवर येणाऱ्या मुंबई येथील अधिवेशनात तीव्र आंदोलन करणार असल्याची माहिती महाराष्ट्र रिक्षा पंचायत अध्यक्ष कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे यांनी दिली.
लोणावळा-खंडाळा कार्ला रिक्षा संघटना कृती समितीच्या वतीने लोणावळा येथील रायउड पार्कमध्ये रिक्षा चालक-मालकांची बैठक झाली. यावेळी बाबा कांबळे बोलत होते. यावेळी रिक्षाचालकांचे ज्येष्ठ नेते बाबु शेख, संजय भालेराव, आनंद सदावर्ते, मल्हार काळे, गणेश चव्हाण, भाऊ माळसकर, राजू बोडके, दिलीप जाधव, भगवान घनवट, सूर्यकांत ठाकूर, भाऊ शिवेकर, भगवान घनवट, कैलास गव्हाणे, अरुण फंड, राजू तांबोली, रमेश सपकाळ, शंकर पवार, संजय नन्नवरे, प्रकाश वाघ, मनोज मोगरे, आनंद साठे आदी उपस्थित होते.
बाबा कांबळे म्हणाले की, महाराष्ट्र सरकारने २०१७ साली रिक्षांचा परवाना (परमिट) खुले केले होते. मागेल त्यास परमिट देण्याचे धोरण ठरवले आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात रिक्षा रस्त्यावर आल्या आहेत. प्रवाशांपेक्षा रिक्षा अधिक झाल्या आहेत. त्यामुळे रिक्षा चालकांमध्ये जीवघेणी स्पर्धा निर्माण झाली आहे. लोकसंख्येच्या तुलनेत रिक्षा परवाने असावेत. असे नियम केंद्र सरकारने ठरवून दिले आहेत. प्रत्यक्ष मात्र लोकसंख्येचा विचार न करता शहरातील रस्त्यांचा विचार न करत भांडवलदार कंपन्यांशी संगनमत करून त्यांच्या रिक्षा विक्रीसाठी सर्व नियमांची पायमल्ल सुरू आहे. “मुक्त रिक्षा परवाना बंद झाला पाहिजे. रिक्षाचालकांचे इतर सर्व प्रश्न सुटले पाहिजेत. अशा आपल्या मागण्या आहे.
यासाठी तीव्र आंदोलन करणार असल्याचे बाबा कांबळे म्हणाले. यावेळी लोणावळा-खंडाळा कार्ला रिक्षा संघटना कृती समितीच्या अध्यक्षपदी संजय भालेराव, महाराष्ट्र रिक्षा पंचायत महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी बाबु शेख, लोणावळा शहराध्यक्षपदी आनंद सदावर्ते यांची नियुक्ती झाली. बाबा कांबळे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच, लोणावळा शहरातील एकमेव महिला रिक्षाचालक अविशा जाधव यांचा देखील त्यावेळी सत्कार करण्यात आला.