महिलेची छेड काढणाऱ्या सुरक्षा रक्षकाचा खून
![Ten people, including a former corporator, have been booked for defrauding a bank through forged documents](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/03/crime-13-1.jpg)
पिंपरी, – सुरक्षा रक्षकाने दारू पिऊन महिलेची छेड काढली. यामुळे संतापलेल्या परिसरातील युवकांनी त्यास बेदम मारहाण केली. उपचारादरम्यान मुंबईमध्ये त्या सुरक्षारक्षकाचा मृत्यू झाला. ही घटना १० मार्च रोजी विवेकानंद नगर, नवी सांगवी येथे घडली.
दुःखी नवलसिंग थापा असे खून झालेल्या सुरक्षा रक्षकाचे नाव आहे. याप्रकरणी महेंद्र गंजे थापा (वय २२, रा. अमृतनगर, मुंब्रा कौसा, जिल्हा ठाणे) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १० मार्च रोजी विवेकानंद नवी सांगवी येथे दुखी थापा याने दारू पिऊन परिसरातील एका महिलेची छेड काढली. यामुळे संतापलेल्या परिसरातील युवकांनी त्याला चांगलाच चोप दिला. त्यानंतर ज्या बंगल्यावर तो सुरक्षारक्षकाचे काम करत होता, तेथील मालकाने ही त्यास बांबूने मारहाण केली.
या मारहाणीत जखमी झालेल्या दुखी थापा याला मुंबईला नेले. १८ मार्च रोजी तळोजा येथील नातेवाईकांना भेटण्साठी दुखी थापा हा गेला असता त्यास दोन तीन अनोळखी व्यक्तींनी बांबूने मारहाण केली असल्याची खोटी माहिती त्याच्या नातेवाईकांनी भोईवाडा, मुंबई येथील पोलिसांना दिली. १९ मार्च रोजी मुंब्रा येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांची प्रकृती खालावली. यामुळे त्याला मुंबईतील केईएम रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान २१ मार्च रोजी त्याचा मृत्यू झाला. यामुळे मुंबईतील भोईवाडा पोलीस ठाण्यात नोंद करून पुढील कारवाईसाठी तळोजा पोलिस स्टेशन नवी मुंबई येथे माहिती पाठविण्यात आली.
तळोजा पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला. फिर्यादीकडे फेर चौकशी केली तसेच तांत्रिक तपासाच्या आधारे खुनाची उकल करण्यात आली. मयत दुखी थापा यांचा काका प्रकाश उर्फ सुनील अजय थापा याने काही दिवसांपूर्वी दुखी थापा याला पिंपरी चिंचवडमधील एका बंगल्यावर वॉचमन म्हणून कामाला लावले होते. कामाच्या ठिकाणी १० मार्च रोजी दुखी थापा याने महिलेची छेड काढली. यातून त्याचा खून झाल्याचे तपासात निष्पन्न झाले. सदरचा प्रकार सांगवी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडल्याने हा तपास आता सांगवी पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे याबाबत अधिक तपास करीत आहेत.