महिला नगरसेविकेशी उध्दट बोलणा-या उद्यान अधिक्षकांची केली कानउघडणी
फोनवर उध्दट भाषा बोलल्याने नगरसेविका कमल घोलप कडाडल्या
पिंपरी ( महा ई न्यूज ) – महापालिकेच्या उद्यान विभागाचे अधिक्षक सुरेश साळुंके यांना प्रभाग क्रमांक 13 मधील विविध कामाविषयी फोन केला असता नगरसेविका कमल घोलप यांना उध्दट भाषा वापरली. त्यामुळे संप्तत झालेल्या घोलप यांनी महापाैर राहूल जाधव यांच्याकडे तक्रार केली. त्यानंतर महापाैरांच्या दालनात उद्यान अधिक्षकांना फैलावर घेत चांगलीच कानउघडणी करत पुन्हा अशी भाषा वापरल्यास त्याच भाषेत उत्तर दिले जाईल, असा इशाराही दिला.
यमुनानगर, निगडीतील प्रभाग क्रमांक 13 मधील नगरसेविका कमल घोलप यांनी उद्यानाच्या कामासंदर्भात उद्यान अधीक्षक सुरेश साळुंके यांना फोन केला होता. मात्र, संभाषणादरम्यान त्यांनी घोलप यांना उद्धट भाषा वापरली. याबाबत घोलप यांनी त्या अधिका-याला फैलावर घेत चांगलीच मस्ती उतरवली. संतापलेल्या घोलप यांनी महापौर राहूल जाधव यांच्या दालनात साळुंके यांना बोलावून जाब विचारला. तसेच तुमची महापालिकेत किती वर्षे सेवा झाली आहे. महिला नगरसेविकांशी कशाप्रकारे बोलायला हवे, हे तुम्हाला समजत नाही का ? अशा शब्दांत सुनावले.
दरम्यान, महापाैर राहूल जाधव यांनी उद्यान अधिक्षक साळुंखे यांना यापुढे लोकप्रतिनिधी बोलताना नीट बोला, अशा प्रकारचे वर्तन खपवून घेतले जाणार नाही, अशा शब्दांत त्यांना सुनावले.