breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

महिलांचे सक्षमीकरण झाले तरच देश महासत्ता होईल – देवेंद्र फडणवीस

  • भोसरीत इंद्रायणी थडीचे फडणवीस यांच्या हस्ते उद्‌घाटन

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

महाराष्ट्रात युतीचे सरकार 2014 ला स्थापन झाले तेंव्हा साडेतीन लाख कुटूंब बचतगटात होती. आता 40 लाख कुटूंब बचतगटांच्या माध्यमातून जोडली गेली आहेत. त्यातील अनेक बचतगटांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहिर केलेल्या एक लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्जाचा लाभ मिळाला आहे. त्यातून हजारो महिला आर्थिक, शैक्षणिक, सामाजिक सक्षम झाल्या आहेत. महिलांचे सक्षमीकरण झाले तरच देश महासत्ता होईल आणि विकासाचा दर दुप्पट गाठता येईल, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भोसरी येथे केले.

भाजपा शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवांजली मंचच्या वतीने संयोजिका पुजा महेश लांडगे यांनी भोसरी येथे आयोजित केलेल्या इंद्रायणी थडीचे उद्‌घाटन गुरुवारी (दि. 30) माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महापौर माई ढोरे, खासदार अमर साबळे, भाजपा शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे, आमदार लक्ष्मण जगताप, राहुल कुल, माजी आमदार शरद सोनवणे, संजय भेगडे, लेखा समितीचे अध्यक्ष सचिन पटवर्धन, प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे, भाजपा शहर युवा अध्यक्ष नगरसेवक रवी लांडगे, भाजपा महिला शहराध्यक्षा शैला मोळक, संयोजिका पुजा महेश लांडगे, पक्षनेते एकनाथ पवार, स्थायी समिती अध्यक्ष विलास मडेगिरी, माजी महापौर नितीन काळजे, राहुल जाधव, सामाजिक कार्यकर्त्या सिंधूताई सपकाळ, नगरसेवक, नगरसेविका उपस्थित होते. यावेळी फडणवीस यांचा आमदार लांडगे व पुजा लांडगे यांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराजांची मुर्ती देऊन सत्कार करण्यात आला. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रतिक्षा कालीदास लांडगे (कबड्डी), सह्याद्री महेश भूजबळ (गिर्यारोहक), आकाश गजानन बांदल (कलाकार), सुरेश धोंडू चिंचवडे (सामाजिक) यांना यावर्षीचा इंद्रायणी थडी पुरस्कार देण्यात आला.

फडणवीस म्हणाले की, लोक प्रतिनिधी जागरुक असेल तरच तो समाजाचा सामाजिक, आर्थिक विकास करु शकतो. राजकारण हे साधन आहे. त्यातूनच समाजाच्या शेवटच्या घटकांचा विकास लोक प्रतिनिधी करु शकतो. असा लोक प्रतिनिधी जनतेच्या मनात घर करतो. महेश हा जनतेच्या मनातील माणूस आहे. पुजा व महेश लांडगे यांनी महिलांचा सामाजिक व आर्थिक थर उंचावण्यासाठी आयोजित केलेला इंद्रायणी थडीचा उपक्रम इतरांना मार्गदर्शक ठरेल असा आहे.

महेश लांडगे म्हणाले की, स्त्री शिक्षणाचा, महिला सक्षमीकरणाचा पाया थोर समाजसुधारक महात्मा जोतीराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी उभारला. त्यांच्यामुळेच भारतीय स्त्रीयांना शिक्षणाचे सुवर्ण प्रवेशव्दार खुले झाले. थोर समाजसुधारक महात्मा जोतीराव फुले यांचा वाडा पुण्यामध्ये ‘समता भूमी’ येथे आहे. त्यातून प्रेरणा घेऊन त्या वाड्याची भव्य प्रतिकृती मुख्य प्रवेशव्दारावर उभारली आहे. या प्रवेशव्दारावर माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील, राजमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले, अहिल्याबाई होळकर, मदर टेरेसा, लता मंगेशकर, कल्पना चावला आणि सिंधूताई सपकाळ यांच्या भव्य प्रतिकृती येथे येणा-या महिला भगिनींना प्रेरणादायी ठरतील. वाड्यात प्रवेश करताच धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा पुर्णाकृती पुतळा लक्षवेधून घेत आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा महाराष्ट्रात सर्वात मोठा 140 फुटांचा पुर्णाकृती पुतळा उभारण्यात येणार आहे. त्याच्या उद्‌घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आणावे, अशी विनंती आमदार लांडगे यांनी माजी मुख्यमंत्री फडणवीस यांना केली.

मराठा आरक्षणाचा धाडसी निर्णय फडणवीस यांनी घेतला. त्याच प्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सीएएचा धाडसी निर्णय घेतला. त्याला आमचा पाठिंबा आहे. हे दर्शविण्यासाठी येथे नागरिकांची सह्यांची मोहिम राबविण्यात येत आहे. फडणवीस साहेब आजही आम्हाला तुम्हीच मुख्यमंत्री आहात. असेही आमदार लांडगे म्हणाले.

स्वागत आमदार महेश लांडगे, प्रास्ताविक नगरसेविका स्विनल म्हेत्रे, सारिका बो-हाडे, आभार कामगार नेते सचिन लांडगे यांनी मानले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button