महाविद्यालयांवर शून्य प्रवेशांची नामुष्की
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/11/addmishion.jpg)
- अकरावीच्या ३२ तुकडय़ा रिकाम्या
पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेअंतर्गत यंदा ३२ तुकडय़ांवर शून्य प्रवेशांची नामुष्की ओढवली आहे. एकाही विद्यार्थ्यांने प्रवेश न घेतलेल्या या तुकडय़ांची बहुतांश कनिष्ठ महाविद्यालये स्वयंअर्थसहाय्यित आणि कायम विनाअनुदानित तत्त्वावरील आहेत. केवळ एकाच अनुदानित महाविद्यालयातील तुकडीमध्ये एकही प्रवेश झाला नाही.
केंद्रीय अकरावी ऑनलाइन प्रवेश नियंत्रण समितीद्वारे अकरावी विज्ञान, कला, वाणिज्य आणि द्विलक्ष्यी शाखेच्या प्रवेशासाठीची प्रवेश प्रक्रिया नुकतीच झाली. त्यानंतर ही माहिती समोर आली. यंदा अकरावी प्रवेशासाठी पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात एकूण २८५ कॉलेजांमध्ये ९७ हजार ४३५ जागा उपलब्ध होत्या. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा अकरावी प्रवेशासाठी पाच हजार ८५ जागांची वाढ करण्यात आली. यंदा झालेल्या प्रवेश प्रक्रियेतून एकूण ६६ हजार ६९२ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला, तर तब्बल ३० हजार ७४३ जागा रिक्त राहिल्या आहेत. त्यामुळे गेल्या वर्षी रिक्त राहिलेल्या २१ हजार ११३ जागांच्या प्रमाणात तब्बल दहा हजारांनी वाढ झाल्याचे स्पष्ट झाले.
यंदा नवीन महाविद्यालयांतील ३२ तुकडय़ांमध्ये एकही प्रवेश झाला नाही. त्यात नामांकित संस्थांच्या कनिष्ठ महाविद्यालयांचाही समावेश आहे. ३० ते १२० विद्यार्थ्यांची प्रवेशक्षमता असलेल्या या पूर्ण तुकडय़ाच विद्यार्थ्यांच्या प्रवेशाविना रिक्त राहिल्या. गेल्या वर्षीही तीसहून अधिक तुकडय़ांवर शून्य प्रवेशांची नामुष्की ओढवली होती. त्यामुळे एकीकडे शून्य प्रवेशांच्या तुकडय़ांची वाढती संख्या आणि दुसरीकडे नव्या महाविद्यालयांना आणि वाढीव तुकडय़ांना मान्यता, असा विरोधाभासही शिक्षण क्षेत्रात दिसून येत आहे.
माहिती देण्यास टाळाटाळ
गेल्या तीन वर्षांतील शून्य प्रवेश आणि शाखानिहाय रिक्त जागांची माहिती मिळण्याबाबत शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडे दोन महिने पाठपुरावा करूनही माहिती देण्यात आली नाही. प्रवेश प्रक्रियेची माहिती एजन्सीकडे आहे, एजन्सीला माहिती देण्यास सांगितले आहे, एजन्सी माहिती देतच नाही अशी उत्तरे देऊन माहिती देण्यास टाळाटाळ करण्यात आली. दोन-तीन वर्षे सातत्याने शून्य प्रवेश होणाऱ्या महाविद्यालयांची माहिती उपसंचालक जाहीर करणार का, असाही प्रश्न उपस्थित होत आहे.