महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी सर्वांनी एकजुटीने काम करायचे आहे, जयंत पाटील यांचा कार्यकर्त्यांना सल्ला
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/11/IMG-20201125-WA0018.jpg)
पिंपरी / महाईन्यूज
“आपल्या सर्वांना पुढील दिवसांत मावळ तालुक्यातील पदवीधर व शिक्षक मतदारांपर्यंत वैयक्तिक पातळीवर संपर्क करायचा आहे. महाविकास आघाडीच्या दोन्ही उमेदवारांना निवडून द्यायचे आहे. आपल्या उमेदवारांना शिक्षक, पदवीधरांच्या प्रश्नांची जाण आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात विधानपरिषदेत ते आपल्याला न्याय मिळवून देतील”, अशा शब्दांत जलसंपदा मंत्री तथा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी विश्वास व्यक्त केला.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते पार्थ पवार यांच्या उपस्थितीत पुणे विभागाच्या पदवीधर मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार अरुण गणपती लाड व शिक्षक मतदारसंघाचे जयंत आसगावकर यांच्या प्रचारार्थ वडगाव मावळ येथे महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीत पाटील बोलत होते. यावेळी महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रतिमेस विनम्र अभिवादन करण्यात आले. कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते स्व. अहमद पटेल यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/11/IMG-20201125-WA0015-1024x461.jpg)