‘महाराजांवर टिका करता येत नाही’, म्हणून प्रतिमा उंचावण्यासाठी नाव जोडण्याचा भाजपचा प्रयत्न – सचिन साठे
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/01/PHOTO-6-scaled.jpg)
- महागाई बेरोजगारीकडे दुर्लक्ष होण्यासाठी भाजपा व आरएसएसचा कुटील डाव
- कॉंग्रेसचे भोसरी ब्लॉक अध्यक्ष विष्णुपंत नेवाळे यांची भाजप नेत्यांवर टिका
पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी
खरा इतिहास दडपून कपोलकल्पित, काल्पनिक इतिहास नवीन पिढीवर लादण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज व इतर थोर राष्ट्रपुरुषांच्या नावांचा वापर भाजपा व आरएसएस करीत आहे. भारतीय स्वातंत्र्य लढ्यात भाजपाच्या व आरएसएसच्या विचारांच्या एकाही व्यक्तींचे काहीही योगदान नाही. त्यांच्या विचारांचे कोणीही राष्ट्रपुरुष स्वातंत्र्य लढ्यात नव्हते. हा इतिहास दुर्लक्षित व्हावा आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या व थोर राष्ट्रपुरुषांच्या नावांचा वापर स्व:ताची प्रतिमा उंचावण्यासाठी करीत नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण करणे, हे भाजपा व आरएसएसचे धोरण आहे, अशी टिका पिंपरी-चिंचवड शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष सचिन साठे यांनी केली.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाशी तुलना करणारे नरेंद्र मोदी यांचे पुस्तक नुकतेच प्रकाशित करण्यात आले. कॉंग्रेसच्या वतीने लेखकाचा व प्रकाशकाचा निषेध करून मंगळवारी (दि. 14) पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात आंदोलन करण्यात आले. यावेळी माजी महापौर कविचंद भाट, माजी नगरसेवक राजाभाऊ गोलांडे, प्रदेश महिला कॉंग्रेसच्या माजी अध्यक्षा शामला सोनवणे, बिंदू तिवारी, भोसरी ब्लॉक अध्यक्ष विष्णूपंत नेवाळे, पिंपरी ब्लॉक अध्यक्ष बाळासाहेब साळुंके, चिंचवड ब्लॉक अध्यक्ष परशुराम गुंजाळ, युवक कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस मयुर जयस्वाल, सेवादलाचे शहराध्यक्ष मकरध्वज यादव, अल्पसंख्यांक सेल शहराध्यक्ष शहाबुद्दीन शेख, सोशल मिडिया शहराध्यक्ष चंद्रशेखर जाधव, एनएसयुआय शहराध्यक्ष वसिम इनामदार, विद्यार्थी कॉंग्रेसचे माजी शहराध्यक्ष विशाल कसबे आदी उपस्थित होते.
साठे म्हणाले की, राष्ट्रपिता महात्मा गांधी व पंडित जवाहरलाल नेहरु यांच्यावर भाजपवाले कायम टिका करतात. ते छत्रपती शिवाजी महाराजांवर टिका करु शकत नाहीत, म्हणून महाराजांबरोबर स्व:ताचे नाव जोडण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत. महाराजांच्या नावाबरोबर तुलना करणे म्हणजे सुर्याबरोबर तुलना केल्यासारखे आहे. पुस्तकाचे लेखक गोयल आणि प्रकाशक यांचा शहर कॉंग्रेसच्या वतीने तीव्र निषेध करीत असल्याचे पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष सचिन साठे यांनी सांगितले.
विष्णूपंत नेवाळे म्हणाले की, मागील पाच वर्षाच्या काळात केंद्रातील मोदी सरकारने राबविलेल्या चुकीच्या धोरणामुळे देशाची अर्थव्यवस्था खिळखिळी झाली आहे. चुकीच्या पध्दतीने लादलेल्या जीएसटी व नोटाबंदीमुळे प्रचंड महागाई वाढली असून बेरोजगारी वाढली आहे. या विषयांकडे सामान्य जनतेचे लक्ष जाऊ नये, म्हणून अशा पध्दतीने कायम वाद निर्माण करणे व चुकीचा इतिहास सादर करणे, हा भाजपा व आरएसएसचा कुटील डाव आहे. हे पुस्तक ताबडतोब मागे घ्यावे व लेखक प्रकाशकांनी जनतेची जाहिर माफी मागावी. अन्यथा हे आंदोलन तीव्र करु, असा इशारा नेवाळे यांनी यावेळी दिला.