महामंडळ अध्यक्ष गोरखे यांनी घेतली केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची भेट
पिंपरी, (महाईन्यूज) – केंद्र सरकारमार्फत मिळणा-या निधी अभावी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाच्या विविध योजना बंद आहेत. मागासवर्गीय समाजाच्या कल्याणासाठी असलेल्या या योजना चालू व्हाव्यात आणि त्यासाठी रखडलेला निधी उपलब्ध करून द्यावा, या मागणीसाठी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाचे अध्यक्ष अमित गोरखे यांनी केंद्रीय समाजकल्याण राज्य मंत्री रामदास आठवले यांची दिल्लीत भेट घेतली.
दिल्ली येथे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची भेट घेऊन अमित गोरखे यांनी या विषयी सविस्तर चर्चा केली. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाच्या काही योजना एनएसएफडी, दिल्ली च्या रखडलेल्या निधी अभावी बंद आहेत. मागासवर्गीय समाजांच्या हिताच्या दृष्टीने या योजना महत्त्वपूर्ण आहेत. या योजना चालू झाल्यास अनेक लाभार्थ्यांना त्याचा फायदा महामंडाळामार्फत पोहचविता येईल. सविस्तर चर्चेअंती रामदास आठवले यांनी योजनांसाठी रखडलेला निधी मिळवून देण्याबाबत सकारत्मकता भूमिका मांडली.
त्याबरोबर येत्या ३ ऑगस्ट २०१९ रोजी निगडी येथे पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती महोत्सव होत आहे. त्याचे निमंत्रण दिले असता त्या कार्यक्रमास उपस्थित राहण्याबाबतही मंत्री रामदास आठवले यांनी आश्वस्त केल्याचे अमित गोरखे यांनी म्हटले आहे.