महापौर पदावरून भाजपमध्ये उभी “फुट”
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/07/2Sarpanch_3.jpg)
- जातीय राजकारणाला फुटले तोंड
- एकाचे माळी, तर दुस-याचे कुणबी “कार्ड”
पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील महापौर पदासाठी भाजपांतर्गत जोरदार रस्सीखेच सुरू आहे. आपल्याच गटाचा व्यक्ती महापौर पदावर असावा यासाठी शहराच्या कारभा-यांनी या संघर्षाला जातीय राजकारणाची फोडणी दिली आहे. भोसरीतील गटाच्या माळी समाजाचा पक्षावर दबाव वाढला आहे. तर, चिंचवडच्या गटाने ओबीसी मराठा कुणबी हे शस्त्र उपसून मुख्यमंत्र्यांकडे दट्टा लावला आहे. सत्तासुंदरीच्या सिंहासनासाठी “माळी विरूध्द मराठा कुणबी” (ओबीसी) असा संघर्ष पेटला आहे. त्याला भाजपचेच नेते खतपाणी घालत असल्याने अवघ्या दीड वर्षातच भाजपमध्ये उभी फूट पडल्याचे चित्र पहायला मिळत आहे.
श्रीमंतीचा तुरा मिरविणा-या पिंपरी-चिंचवड महापालिकेतील महत्वाच्या पदांवर मर्जीतला व्यक्ती (नामधारी) बसविण्यासाठी भोसरीचे आमदार महेश लांडगे आणि चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्यात जोरदार खेळ्या सुरू असतात. पालिकेत भाजपची सत्ता आणण्यासाठी दोन्ही आमदारांचा मोलाचा वाटा असला, तरी पहिल्या वर्षी लांडगे समर्थक नितीन काळजे यांना महापौर पदी ऐनवेळी संधी मिळाली. मात्र, पदासाठी चर्चेत राहिलेले निष्ठावंत नामदेव ढाके यांच्यावर अन्याय झाला. काळजे यांना महापौर केल्यानंतर सत्तेच्या प्रथम वर्षाची स्थायी समिती आमदार जगताप यांच्या समर्थकाकडे राहिली. दुस-या वर्षी देखील जगताप समर्थकांनी स्थायीच्या चाव्या आपल्याकडे ठेवल्या. सलग दोन वर्षे स्थायीवर जगताप गटाची मालकी कायम राहिल्याने लांडगे गटाने दुस-यावेळी महापौर पदासाठी पक्षावर दबाव वाढविला आहे.
महापौर आणि स्थायी समिती सभापती या दोन पदांसह विषय समितीच्या सभापती पदांसाठी दोन्ही नेत्यांमध्ये प्रतिष्ठेचा संघर्ष होतो. जगताप यांचा शहरावर शिरस्ता असल्याने पालिकेचा संपूर्ण कारभार त्यांच्या हातात असावा, असे समर्थकांना वाटते. तर, लांडगे गटाला पदांच्या बाबतीत कमीपणा वाटून घेतला जात असल्यामुळे कुरघोड्या केल्या जातात. या दोन्ही नेत्यांनी आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीचे गणित आखून महापौर पदासाठी प्रतिष्ठा पणाला लावली आहे.
चालू वर्षाच्या स्थायी समिती सभापती पदासाठी इच्छुक राहूल जाधव यांना डावलल्याने लांडगे समर्थकांनी जगताप गटावर नाराजी व्यक्त करत महापौर नितीन काळजे, स्थायी सदस्य राहूल जाधव, तत्कालीन क्रीडा सभापती लक्ष्मण सस्ते यांनी राजीनामे दिले होते. त्यामुळे आता महापौर पदासाठी त्यांनी माळी समाजाच्या आडून निशाणा साधण्याचा प्रयत्न केला आहे. माळी समाजाने कालच पत्रकार परिषद घेऊन समाजाला न्याय न मिळाल्यास पक्षाला परिणामांना सामोरे जावे लागेल, असा इशारा दिला आहे. ही भोसरीकरांची खेळी पाहून जगताप गटातील 25 पेक्षा अधीक नगरसेवकांनी मराठा कुणबी समाजाच्या समर्थकाला महापौर करण्यासाठी तातडीने आज रविवारी (दि. 29) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा बंगल्यावर धडक दिली. मुख्यमंत्र्यांनी सर्वसमावेशक निर्णय घेण्याचे आश्वासन दिल्याने शिष्टमंडळ उद्योगनगरीकडे परतले.
महापौर पदावरून दोन्ही आमदारांमधील संघर्षामध्ये जातीय राजकारणाची ठिणगी पडली आहे. त्यामध्ये सामाजिक तेढ निर्माण होऊन पक्षात उभी फुट पडल्याचे चित्र पहायला मिळत आहे. तथापि, निष्ठावंतांचा एक गट जातीय राजकारणापासून अलिप्त आहे.