महापालिकेत ‘अर्थपुर्ण’ वाटाघाटीने पाणी पुरवठा निविदांना मुदतवाढ
पाणी पुरवठा अधिका-यांची मे. शुभम उद्योग ठेकेदारांवर मेहेरबानी
पिंपरी|महाईन्यूज|प्रतिनिधी|
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागातील अधिका-यांच्या अर्थपुर्ण वाटाघाटीमुळे ठराविक ठेकेदारांवर मेहेरबानी होवू लागली आहे. एकाच ठेकेदाराला डोळ्यासमोर ठेवून निविदा प्रक्रिया राबविणे, शिवाय त्या-त्या ठेकेदारांना मुदतवाढ देण्याचा पराक्रम हे अधिकारी करु लागले आहेत. त्यात शहरातील पंप हाऊस चालन करणा-या ठेकेदार हा पालिकेचा जावई आहे का? असा सवाल उपस्थित होवू लागला आहे. महापालिकेच्या स्थायी समिती सभेत त्या ठेकेदाराला दुस-यांना मुदतवाढ देण्याच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली. या सभेच्या अध्यक्षस्थानी विलास मडिगेरी होते.
पिंपरी चिंचवड महापालिकेने थेरगाव गावठाण, पुनावळे, वाकड काळाखडक, सांगवी गावठाण, पिंपळे गुरव, दापोडी, चिखली जाधववाडी, रहाटणी, दिघी, च-होली, बोपखेल यासह अन्य भागातील शुध्द पाणी पुरवठा करणा-या पंप हाऊसचे चालन करणेकामी 2018-19 मध्ये निविदा राबविली होती. त्या ठेकेदार दुस-यांना मुदतवाढ देण्यात आलेली आहे. मे. शुभम उद्योग यांच्याकडे हे काम आहे. त्याला स्थायी समितीने एक महिन्यांची मुदतवाढ दिलेली आहे.
महापालिकेचे शहरात पाणीपुरवठा विभागाचे 15 हून अधिक पंप हाऊस आहेत. या कामाची मुदत तीन महिन्यांपूर्वीच संपुष्टात आललेली आहे. सुरुवातीला निविदा प्रक्रिया राबविण्यात आली होती. मात्र या निविदा प्रक्रियेत स्पर्धा न झाल्याचे कारण देत यातील अटी व शर्ती बदलून नव्याने निविदा प्रक्रिया राबवावी यासाठी स्थायी सभापतींनी पत्र दिले. त्यानंतर पाणीपुरवठा विभागाने विद्युत पंप परिचालनाची नव्याने निविदा प्रक्रिया राबविली.
ठेकेदाराचा अनुभव, परिचालन करण्यासाठी कर्मचाऱ्यांचा पुरवठा, कुशल, अर्धकुशल कामगार यातील अनेक अटी काढून टाकण्यात आल्या. नव्याने राबविण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेत 9 ठेकेदारांनी सहभाग नोंदविला. ही निविदा प्रक्रिया खुली करण्यासाठी घेतल्यानंतर एकच पाकिट ओपन करण्यात आले. यातील ठेकेदार संस्था पात्र होत नसल्याचे लक्षात आल्यानंतर दुसऱ्या ठेकेदारांची निविदा ओपन न करता ही प्रक्रिया थांबविण्यात आली आहे.
पाणीपुरवठा विभागाने काढलेली निविदा ही ठराविक ठेकदाराला डोळ्यासमोर ठेवून अटी व शर्ती टाकण्यात आल्याचा आरोप होवू लागला आहे. यानंतर या अटी व शर्ती काढून घेऊन नव्याने निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. मात्र पालिकेतील एका पदाधिकाऱ्याच्या नातेवाईकांनी या निविदा प्रक्रियेत सहभाग नोंदवूनही त्यांची डाळ शिजेना झाली आहे. त्यामुळे निविदा खुली करण्याची प्रक्रिया थांबविण्यात आली. आता अनुभवाचा दाखला अनधिकृतरित्या जोडून या ठेकेदाराला टेंडर देण्याचा घाट घालण्यात आल्याचे समोर आले आहे. विद्युत पंप परिचालनाचा ठेका असल्याने अनुभवी पर्यवेक्षक असावा, अशी अट प्रशासनाने घातली आहे. अकुशल कामगार घ्या, असा या पदाधिकाऱ्याचा आग्रह आहे. तर कुशल अथवा अर्धकुशल पर्यवेक्षक असावा, असा प्रशासनाचा आग्रह आहे.