महापालिकेच्या शाळेतील बदली झालेले शिक्षक रुजू न झाल्यास वेतन थांबविणार
- शिक्षण अधिकारी ज्योत्स्ना शिंदे यांचा शिक्षकांना कारवाईचा इशारा
पिंपरी ( महा ई न्यूज ) – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्राथमिक शाळेतील काही शिक्षक वर्षोनुवर्षे एकाच ठिकाणी कार्यरत आहेत. त्यातील प्रशासकीय बदली धोरणानूसार पाच टक्के शिक्षकांच्या बदल्या करण्यात आलेल्या आहेत. यामध्ये 48 शिक्षकांना बदली आदेश झाल्यानंतर तात्काळ रुजू होण्याचे आदेश दिले होते. परंतू, अद्यापही काही शिक्षक बदली झालेल्या ठिकाणी रुजू न होता बदली रद्द करण्यासाठी राजकीय दबाव तंत्राचा वापर करु लागले आहेत. त्या शिक्षकांचे वेतन थांबविण्याचे आदेश शिक्षण विभागाच्या प्रशासन अधिकारी ज्योत्स्ना शिंदे यांनी दिले आहेत.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्राथमिक शाळा आस्थापनेवर मुख्याध्यापक, पदवीधर, शिक्षक, उपशिक्षक कार्यरत आहेत. त्यापैकी काही शिक्षक वर्षांनूवर्षे एकाच शाळेत कार्यरत आहेत. अशा शिक्षकांच्या बदली करण्याचे आदेश 18 मे 2019 रोजी प्रशासन अधिका-यांनी दिले होते. त्यातील सन संचमान्यतेनूसार कार्यरत पदांच्या पाच टक्के शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. तसेच पदवीधर व मुख्याध्यापक पदावर पदोन्नती देताना त्याच शाळेत दिली गेली असल्यास पदोन्नतीचा दिनांक विचारात न घेता त्यापुर्वीचा सध्याचा शाळेतील रुजू दिनांक विचारात घेतली आहे. ज्यांची 53 वर्ष सेवा पुर्ण झालेल्या कर्मचा-यांना वगळण्यात आलेले असून यापैकी ज्यांनी विनंती बदलीसाठी अर्ज सादर केलेला आहे. त्यांची नावे बदली यादी घेतली आहेत.
दरम्यान, मराठी विभागाचे मुख्याध्यापक, पदवीधर शिक्षक, उपशिक्षक आणि उर्दुचे मुख्याध्यापक, पदवीधर शिक्षक, उपशिक्षक असे एकूण 1017 संच मान्यतेनूसार कार्यरत पदे असून त्यातील 50 जणांच्या बदल्या केलेल्या आहेत. बदली आदेश झाल्यानंतर तात्काळ रूजू होण्याचे आदेश दिले होते. मात्र, रुजू न झालेल्या शिक्षकांचा अहवाल मागितला असून त्या शिक्षकांचे वेतन थांबविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच शिक्षकांच्या विनंती बदली अर्जावर देखील लवकरच कार्यवाही करुन त्या बदल्या देखील करण्याचे आदेश दिले आहेत.
बदल्या रद्द करण्यासाठी पदाधिका-यांच्या शिफारसी
महानगरपालिकेच्या अनेक प्राथमिक शाळांमध्ये अनेक शिक्षक, मुख्याध्यापक वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी ठाण मांडून बसलेल्या शिक्षकांच्या बदल्या करण्यात आलेल्या आहेत. मात्र, प्रशासकीय धोरणानूसार केवळ 5 टक्केच बदल्या करण्यात आलेल्या असून विनंती अर्जाच्या बदल्याही लवकरच करण्यात येणार आहेत. परंतू, सदरील बदल्या रद्द करण्यासाठी महापालिका पदाधिकारी, नगरसेवकांचा शिफारसी शिक्षकांनी देत वैद्यकीय कारणेही सांगितलेली आहेत. त्यामुळे राजकीय दबावापोटी कोणाच्याही बदल्या रद्द न करण्याचे आदेश आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी शिक्षण विभागाच्या प्रशासन अधिका-यांना दिले आहेत. त्यानूसार बदली केलेल्या एकाही शिक्षकांची बदली रद्द होणार नाही, असे ठामपणे प्रशासन अधिकारी शिंदे यांनी सांगितले आहे.