महापालिकेच्या प्रभाग समितीवर भाजपचे वर्चस्व; अध्यक्षांची निवड बिनविरोध
![Mahalunge police have arrested three people, including a guard, for stealing six bearings of a gear box from a company. A case has been registered against the BJP corporator of Pimpri-Chinchwad Municipal Corporation along with her husband and they are absconding.](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/11/pcmc-bjp-1-696x348.jpg)
पिंपरी |महाईन्यूज|
पिंपरी-चिंचवड महापालिकेमध्ये भाजपची सत्ता आहे. तर महापालिकेच्या आठही प्रभागाच्या अध्यक्षपदीही भाजपच असणार आहे. आठही प्रभाग समिती अध्यक्षांची निवडणूक बिनविरोध होणार आहे. प्रभाग अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या मुदतीत सोमवारी भाजप नगरसेवकांनी अर्ज भरले आहेत. विरोधातील राष्ट्रवादी कॉंग्रेसने अर्ज भरले नाहीत. त्यामुळे प्रभाग अध्यक्षांची निवडणूक बिनविरोध होणार आहे. त्यावर 9 ऑक्टोबर रोजी शिक्कामोर्तब होणार आहे.
भाजपकडून “अ’ प्रभाग अध्यक्षपदासाठी शर्मिला बाबर, “ब’ प्रभागासाठी सुरेश भोईर, “क’ प्रभागासाठी राजेंद्र लांडगे, “ड’ प्रभागासाठी सागर आंगोळकर, “ई’ प्रभागासाठी विकास डोळस, “ग’ प्रभागासाठी बाबा त्रिभुवन यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे. “ह’ प्रभाग अध्यक्षपदासाई हर्षल ढोरे आणि “फ’ प्रभाग अध्यक्षपदासाठी कुंदन गायकवाड यांचा अर्ज भरला आहे. अर्ज भरण्यासाठी आज दुपारी तीन ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत वेळ होती. या मुदतीत केवळ भाजपच्या नगरसेवकांचे अर्ज आले. विरोधातील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेवकांनी अर्ज भरले नाहीत. त्यामुळे बिनविरोध निवडणूक होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
महापालिकेच्या आठ प्रभाग समित्या आहेत. विद्यमान अध्यक्षांचा कार्यकाळ एप्रिल महिन्यातच संपला होता. प्रभाग समित्या बरखास्त होत नसल्याने करोनाच्या पार्श्वभुमीवर त्यांना पुढील आदेशापर्यंत मुदतवाढ मिळाली होती. राज्य सरकारने निवडणूक घेण्यास परवानगी दिली आहे. व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे 9 ऑक्टोबर रोजी प्रत्यक्षात निवडणूक होणार आहे. या सभेत बिनविरोध निवडीवर शिक्कामोर्तब होईल. अपंग कल्याण विभागाच्या आयुक्त प्रेरणा देशभ्रतार निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कामकाज पाहणार आहेत.