महापालिका शाळांच्या साफसफाईची निविदा 53 टक्के जादा दराने, निविदा रद्दची मागणी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/02/download-1.jpg)
- आयुक्तांना विरोधी पक्षनेते दत्ता साने यांचे पत्र
पिंपरी ( महा ई न्यूज ) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सर्व शाळांमधील दैनंदिन साफसफाई व शाैचालयाची स्वच्छता कामाची निविदा तब्बल 53 टक्के जादा दराने काढण्यात आली. त्यामुळे महापालिकेचे आर्थिक नुकसान होत असून सदरील निविदेत सुध्दा ठेकेदारांनी रिंग केल्याचे शक्यता आहे. त्यामुळे सदरील निविदा रद्द करुन नव्याने निविदा काढण्यात यावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते दत्ताकाका साने यांनी केली.
महापालिका आयुक्त श्रावण हर्डिकर यांना पत्र दिले. त्यात म्हटले आहे की, महानगरपालिकेच्या प्राथमिक,माध्यमिक व औद्यागिक प्रशिक्षण संस्था (आय.टी.आय.) यांची दैनंदिन साफ सफाई व मुता-या व शौचालय यांची तांत्रिक पध्दतीने स्वच्छता करणाच्या कामासाठी मनपामार्फत निविदा मागविल्या होत्या. हि निविदा तब्बल ५३ % जास्त दराने निविदा भरण्यात आलेली आहे. (निविदा नोटीस क्र. ८/२०१८-२०१९) एवढ्या जास्त दराने निविदा भरली गेल्यामुळे या निविदेबाबत साशंकता निर्माण होत आहे.
तसेच सदर निविदा काढताना कुठल्या नियमांचा वापर केला हे स्पष्ट होत नाही, सदर निविदेच्या अटी शर्ती काही ठराविक ठेकेदारांनाच डोळ्यासमोर ठेवून केलेल्या आहेत याबाबत सशंय निर्माण होत आहे. ( अट क्र. ४ मधील ११,१२ व १३) सदरच्या निविदा व अटी या जाचक व इतर ठेकेदार पात्र होऊ नयेत म्हणून संगनमताने टाकल्याचे स्पष्ट होत आहे. याची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे. सदरची निविदा फक्त सात ठेकेदारांनीच भरलेली आहे. व त्यापैकी फक्त तीनच ठेकेदार पात्र कसे झाले त्यातही क्रिस्टल इंटेग्रटेड सर्विसेस प्रा.लि. व बी.व्ही.जी. इंडिया लि. यांचा दोघांचा दर समान म्हणजे ५०% जास्त असून ब्रिस्क इंडिया प्रा.लि. यांचा दर ५३% नी जास्त आलेला आहे. कोणतीही निविदेचा पात्र अपात्र ठेकेदार तक्ता प्रसिध्द केल्यानंतर तीन दिवसानी पाकीट क्रमांक २ उघडावयाचे असते परंतु या निविदेमध्ये पात्र अपात्र तक्ता दि. ५/२/२०१९ रोजी प्रसिध्द केल्यानंतर त्याच दिवशी पाकीट क्र. २ उघडण्यात आले. यामागचे प्रयोजन काय? असे म्हटले आहे.
सदरचे दर निविदा दरापेक्षा जास्त असून निविदेमध्ये टाकलेल्या अटी व शर्तीमुळे केवळ तीनच ठेकेदार यांच्यासाठीच टाकण्यात आल्याचे दिसून येते. मनपाच्या निविदाविषयक नियमांचे पालन न करता काही ठराविक ठेकेदारांच्या फायद्यासाठी संगनमताने टाकल्याचे दिसून येत आहे. वरील बाबींचा विचार करता या निविदेमध्ये रिंग झाल्याचे सिध्द होत आहे. यामुळे महानगरपालिकेचे आर्थिक नुकसान होणार असल्याने सदरची निविदा रद्द करण्यात येऊन नव्याने निविदा काढण्यात यावी, अशीही मागणी केली आहे.