महापालिका आयुक्त श्रावण हर्डिकर यांची लवकरच बदली?
![State government slaps Municipal Commissioner](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/12/श्रावण-हर्डिकर.jpg)
पिंपरी |महाईन्यूज|
पिंपरी – चिंचवड स्मार्ट सिटीचा अंधाधुंद कारभार, कोरोना काळातील थेट खरेदी, वाकडच्या रस्त्यावरुन झालेले रणकंदन, ठेकेदारांच्या हिताचे निर्णय, एफडीआर-बॅंक गॅरंटी घोटाळा, बाॅयो-मेडिकल वेस्ट निविदा, कचरा निविदा आणि दिवसाआड पाणी टंचाईमुळे आयुक्त श्रावण हर्डिकर अडचणीत वाढ होवू लागली आहे. त्यामुळे आयुक्त स्वत:च मुंबई वारी करुन महाविकास आघाडीतील नेत्यांच्या गाठीभेटी घेत आहेत. दरम्यान, येत्या आठवडाभरात हर्डिकर यांना मुंबई मंत्रालयात सचिव पदावर पदोन्नती देवून बदली होणार असल्याची चर्चा पालिका वर्तुळात रंगली आहे.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांचा कार्यकाल पूर्ण झाला आहे. त्यामुळे स्वत:आयुक्तच बदली करून घेण्यासाठी इच्छुक आहेत. मात्र कोरोनाच्या परस्थितीत हर्डीकर यांनी चांगले काम केल्याने त्यांची बदली लांबणीवर पडली होती. परंतू, मागील पंधरा दिवसापासून आयुक्त मुंबई मंत्रालय वारी करु लागले आहेत. त्यामुळे त्यांच्या बदलीच्या चर्चेला पुन्हा जोर धरला आहे.
भारतीय जनता पक्षाची सत्ता पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत आल्यानंतर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी महानगरपालिकेच्या आयुक्त पदी श्रावण हर्डीकर यांची नियुक्ती केली होती. हर्डीकर यांनी महापालिकेचे सूत्रे हाती घेतल्यानंतर स्मार्ट सिटी, बीआरटी, मेट्रो, शहर विकास आराखडा, स्वच्छता, वाहतूक नियंत्रण आदी विकास कामांना गती दिली होती. मात्र, त्याचा तीन वर्षाचा कालावधी पूर्ण झाल्याने बदली होणार असल्याची चर्चा सुरु आहे.
राज्यात महाविकास आघाडीच्या सरकारने सनदी अधिका-यांच्या बदल्या सुरु केल्या आहेत. महापालिकेचे आयुक्त हर्डिकर हे बदली करुन घेण्यास इच्छुक असून त्यांनी स्वत:च प्रयत्न सुरु केले आहेत. महापालिकेतील सत्ताधारी भाजप आणि राष्ट्रवादी, शिवसेना नेत्यांचे वाद, आगामी महापालिका निवडणुका, कोरोना कालावधीतील थेट खरेदीवरुन आरोप-प्रत्यारोप सुरु झालेत. त्यामुळे आयुक्तांच्या अडचणी आणखी वाढणार आहे. राजकीय दबाव वाढू लागला आहे. त्यामुळे ते स्वताः बदली करण्यासाठी मुंबई मंत्रालय वारी करु लागले आहेत, अशी माहिती सुत्रांनी दिली.