मराठा आरक्षण प्रश्नी पिंपरी चिंचवडच्या खासदार, आमदारांच्या कार्यालयासमोर उद्या ठिय्या आंदोलन
सकल मराठा क्रांती मोर्चा पिंपरी चिंचवड करणार आंदोलन
पिंपरी ( महा ई न्यूज ) – मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, यासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी उद्या बुधवारी पिंपरी चिंचवडमधील खासदार, आमदारांच्या जनसंपर्क कार्यालयासह घरासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे, असे पिंपरी चिंचवड सकल मराठा क्रांती मोर्चांच्या वतीने दिलेल्या प्रसिध्दीपत्रकांत म्हटले आहे.
पिंपरी चिंचवड शहरात सकल मराठा समाजाकडून मराठा आरक्षणासह प्रलंबित मागण्याबाबत आंदोलन करण्यात येत आहे. मराठा आरक्षणाबाबत पिंपरी चिंचवडच्या खासदार, आमदारांनी केंद्र व राज्यात आवाज उठवून मराठा समाजाला न्याय मिळवून द्यावा, या लोकप्रतिनिधींना मराठा समाजाच्या मागण्यांबाबत जाग यावी, याकरिता त्यांच्या जनसंपर्क कार्यालय आणि घरासमोर उद्या बुधवारी ( दि.8) ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे.
सकल मराठा समाजाच्या वतीने लोकप्रतिनिधींच्या घरासमोर आंदोलन करण्यात येणार आहे. यामध्ये सकाळी 9 वाजता निगडीतील भेळ चाैकात भाजपचे राज्यसभा खासदार अमर साबळे, सकाळी 10 वाजता थेरगांवला शिवसेना खासदार श्रीरंग बारणे, सकाळी 11 वाजता मोरवाडीतील भाजपाचे जनसंपर्क कार्यालयासमोर शहराध्यक्ष तथा आमदार लक्ष्मण जगताप, आमदार महेश लांडगे आणि दुपारी 12 वाजता पिंपरीतील शिवसेना आमदार गाैतम चाबुकस्वार यांच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येणार आहे. तरी पिंपरी चिंचवड शहरातील सर्व सकल मराठा क्रांती मोर्च्यातील समाज बांधवानी उपस्थित रहावे, असे आवाहन सकल मराठा समाजाकडून करण्यात आले आहे.