मराठवाडा जनविकास संघातर्फे दुष्काळग्रस्त शेतक-यांसाठी ‘जय जवान, जय किसान बियाने दान’ अभियान
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/10/IMG-20191010-WA0025.jpg)
पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या कृपेने आणि मराठवाडा मुक्ती संग्रामातील स्वातंत्र सैनिकांच्या स्मरणार्थ मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त भागातील आत्महत्या ग्रस्त शेतकरी कुटूंब आणि देशासाठी बलीदान देणा-या शहिद सैनिकांच्या कुटूंबियांसाठी मराठवाडा जनविकास संघातर्फे रब्बी हंगाम पेरणीसाठी “जय जवान जय किसान बियाने दान” अभियान राबविण्यात येत आहे.
मराठवाडा जनविकास संघ पिंपरी-चिंचवड, पुणे यांच्या वतीने श्री क्षेत्र तुळजापूर येथे गुरूवारी (दि. १०) तुळजापूर येथील तुळजाभवानी चरणी अभिषेक करून बीयाने दान हा कार्यक्रम हाती घेतला. उस्मानाबाद जिल्ह्यातील आत्महत्या ग्रस्त शेतकरी कुटूंब व शहिद सैनिक कुटूंबांना बियाने थैलींचं दान करण्यात आला. “जय जवान जय किसान बियाने दान” अभियान उपक्रम हभप श्री बब्रुवान वाघ महाराज यांच्या शुभ हस्ते करण्यात आला.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे हभप श्री राजेन्द्र महाराज मोरे, नगरसेवक सचिन रोचकरी, पंचायत समिति सदस्य दत्ता शिंदे, राजपूत समाज संगठन पिंपरी-चिंचवड शहर अध्यक्ष शिवकुमारसिंह बायस, संजय सूर्यवंशी, शिवाजी सुतार, व्यंकट हैतगे यांची उपस्थिती होती.
हभप बब्रुवान वाघ महाराज म्हणाले की, मराठवाडा ही थोर संतांची पुण्यभूमी आहे. अशा पुण्यभूमीत अरूण पवार यांनी जन्म घेतला. नोकरी निमित्त ते पुण्याला गेले व हिच आपली कर्मभूमी मानून इमानदारी व प्रामाणिकतेने काम करून घाम गाळून खडतर प्रवास सुरू केला. त्यांनी यशाचा उत्तूंग असा डोंगर उभा केला. त्यांनी विविध समाजोपयोगी कामे करण्यासाठी मराठवाडा जनविकास संघ या संस्थेची स्थापना करून नेहमी गोर गरीब लोकांची, मुक्या जनावरांची, पर्यावरणाचे रक्षण करून एक प्रकारे देशसेवा करण्याचे व्रत घेतले आहे.
नितीन चिलवंत म्हणाले की, पुण्यातील मोठमोठे उद्योगपती व कंपण्यांमधून सीएसआर फंडाचा आपल्या मराठवाडातील नागरीक, विद्यार्थी यांच्यासाठी किती उपयोग करता येईल. याचा प्रामुख्याने विचार व्हावा, असे नमुद केले.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक नितिन चिलवंत यांनी केले. सुत्रसंचालन प्रकाश इंगोले यांनी केले. मराठवाडा जनविकास संघाचे संस्थापक अध्यक्ष अरूण पवार यांनी आभार मानले.
आत्महत्या ग्रस्त शेतकरी कुटूंब व शहिद सैनिकांच्या कुटूंबियांनी बी-बियाने मिळाल्याबद्दल मनापासून आभार मानले.