मनपा पतसंस्थेच्या सभासदांना शासन निर्णयानंतर मिळणार 13 टक्के लाभांश
पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवकांची पतसंस्थेने सन 2019-2020चा 13 टक्के लाभांश देण्याचे ठरविले आहे. परंतू, देशभर कोरोना कोविड 19 च्या वाढत्या प्रादुर्भावामुळे केंद्र सरकारने लॉकडाऊन जाहिर केले आहे. या कालावधीत संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा घेता येत नाही. लाभांश वाटप करण्याची घोषणा वार्षिक सर्वसाधारण सभेत करणे कायदेशीर बंधनकारक असल्याने याबाबत मार्गदर्शन करावे अशा आशयाचे पत्र पतसंस्थेच्या पदाधिका-यांनी सहकारी संस्था उपनिबंधक पुणे शहर क्र. 3, शाहूराज हिरे यांना दिले होते.
यानंतर 2 जून 2020 रोजी त्यांच्याशी पतसंस्था पदाधिका-यांची बैठक झाली. या बैठकीत उपनिबंधक हिरे यांनी सांगितले की, येत्या 10 ते 12 दिवसात शासनाकडून सहकारी संस्थांच्या लाभांश वाटपाबाबत व वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्याबाबत धोरणात्मक निर्णय होणे अपेक्षित आहे, अशी माहिती पतसंस्थेचे चेअरमन सीमा सुकाळे, व्हा. चेअरमन दत्तात्रय ढगे, सचिव मुकुंद वाखारे, खजिनदार महादेव बोत्रे यांनी प्रसिद्धीस दिली आहे.
पतसंस्थेचा लाभांश सहकारी कायदा व संस्था उपनिधीनुसार वार्षिक सर्वसाधारण सभा घेऊन जाहिर करण्यासाठी 30 सप्टेंबर ही अंतिम मुदत आहे. परंतू संस्था सभासदांचे हित व आर्थिक निकट लक्षात घेऊन पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवकांची सहकारी पतसंस्था दरवर्षी साधारणपणे मे किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित करून लाभांश जाहिर करते.
सन 2019-2020 साठी सभासदांना 13 टक्के लाभांश देण्याबाबत पतसंस्थेच्या संचालक मंडळाने सर्वानुमते निर्णय घेतला आहे. परंतू यावर्षी लॉकडाऊनमुळे वार्षिक़ सर्वसाधारण सभा घेण्याबाबत शासनाच्या निर्णयाची प्रतीक्षा करण्यात येत आहे, अशी माहिती संस्थेच्या वतीने प्रसिद्धीस देण्यात आली आहे.