भोसरीच्या लांडगेवस्ती येथून 9 लाखांचा गांजा जप्त, गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई
पिंपरी | महाईन्यूज
भोसरीतील लांडगेवस्ती येथे गांजा भरलेले पोते घेऊन उभा असलेल्या व्यक्तीला पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा युनिट 1 च्या पथकाने रंगेहात पकडले. त्याच्याकडून काळ्या बाजारातील 9 लाख 37 हजार रुपये किंमतीचा 37 किलो 500 ग्रॅम गांजा जप्त केला. ही कारवाई काल शनिवारी (दि. 10) करण्यात आली.
दत्ता पुरुषोत्तम कल्याणी (वय 25, रा. शिवशक्ती कॉलनी नं 1, शिंदे यांच्या भाड्याच्या खोलीत, लांडगेवस्ती, भोसरी, पुणे/ मूळ रा. मु. पो. औराद शहाजनी, ता. निलंगा, जि. लातूर) याला ताब्यात घेतले आहे.
पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेने अवैध धंदे रोखण्यासाठी तगडी कारवाई हाती घेतली आहे. त्यासाठी या पथकातील पोलीस कर्मचारी शहरातील बारीक हालचालींवर कटाक्षाने लक्ष ठेवून आहेत. गुन्हे शाखा युनिट 1 च्या पथकातील निरीक्षक उत्तम तांगडे हे कर्मचा-यांसोबत पेट्रोलिंग करत होते. भोसरीतील लांडगे वस्ती याठिकाणी पेट्रोलिंग पथक आल्यानंतर शिपाई नितीन खोसे यांना शिवशक्ती कलनी 1 व 2 च्या समोरील मैदानात एक व्यक्ती संशयीतपणे उभारलेला दिसला.
पोलिसांनी त्याला शिताफिने ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता त्याच्याजवळ पोत्यात भरलेला 37 किलो 500 ग्रॅम गांजा मिळून आला. गांजाची बाजारभावानुसार 9 लाख 37 हजार 710 रुपये किंमत आहे. हा सर्व गांजा पोलिसांनी जप्त केला. त्याच्यावर अंमली पदार्थ कायदा अन्वये भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त श्रीकृष्ण प्रकाश, गुन्हे शाखा उपायुक्त सुधीर हिरेमठ, सहायक आयुक्त (गुन्हे) आर. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक (गुन्हे) उत्तम तांगडे, सहायक निरीक्षक रविंद्र गावंडे, हवालदार आनंद बनसोडे, अमित गायकवाड, नाईक मनोजकुमार कमले, मारुती जायभाये, अंजनराव सोडगिर, शिपाई नितीन खोसे, गणेश सावंत, विशाल भोईर तसेच अंमली पदार्थ विरोधी पथकाचे सहायक उपनिरीक्षक राजन महाडिक, हवालदार राजेंद्र बांबळे, शिपाई अजित कुटे, प्रसाद कलाटे यांनी केली.