भीमा कोरेगाव दंगलीतील आरोपींना अटक करा – राहुल डंबाळे
- ‘संभाजी भिडे’ म्हणजे भगवा दहशतवाद
- राहुल डंबाळे यांनी केली स्फोटक टिका
पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी
भीमा कोरेगाव घटनेतील आरोपी ‘संभाजी भिडे’ हे म्हणजे भगवा दहशतवाद आहेत. त्यांच्यावर 2 जानेवारी 2018 रोजी पिंपरी पोलीस ठाण्यात कलम 307 व इतर कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परंतू आजपर्यंत त्यांना व त्यांच्या इतर साथीदारांना अटक झाली नाही. या प्रकरणी आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांवर दाखल झालेले इतर गुन्हे मागे घेण्याबाबत शासन निर्णयानुसार त्वरित कार्यवाही करावी, अशी मागणी रिपब्लिकन युवा मोर्चाचे महाराष्ट्र पक्षनेता राहुल डंबाळे यांनी केली.
भीमा कोरेगाव येथे 1 जानेवारी 2018 रोजी झालेल्या दंगलीतील आरोपी असणा-या संभाजी भिडे यांना अटक करावी या मागणीसाठी ॲट्रॉसिटी जनजागरण परिषदेच्या वतीने पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात सोमवारी (दि. 14) सत्याग्रह आंदोलन डंबाळे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले) शहराध्यक्ष सुरेश निकाळजे, सुवर्णा डंबाळे, कष्टकरी कामगार पंचायतीचे बाबा कांबळे तसेच रवी सावळे, प्रमोद क्षिरसागर, सचिन वाघमारे आणि विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. या आंदोलनानंतर आंदोलनकर्त्यांनी पोलीस अधिका-यांना आपले निवेदन दिले.
यावेळी डंबाळे म्हणाले की, आंबेडकरी चळवळ ही नेहमी नक्षलवाद विरोधी आहे. भीमा कोरेगाव हे आंबेडकर चळवळीचे प्रेरणास्थान आहे. यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले) शहराध्यक्ष सुरेश निकाळजे म्हणाले की, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाअंतर्गत विराज जगताप व संतोष अंगद यांच्या हत्येस जबाबदार असणा-या आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई करावी. कष्टकरी कामगार पंचायतीचे अध्यक्ष बाबा कांबळे म्हणाले की, पुरोगामी विचाराने चालणा-या महाविकास आघाडी सरकारने भीमा कोरेगाव प्रकरणातील आरोपींवर कायदेशीर कारवाई करावी. अन्यथा आगामी काळात या विषयावर रिपब्लिकन युवा मोर्चा बरोबरच कष्टकरी कामगार रस्त्यावर उतरुन तीव्र आंदोलन करील, असा इशारा बाबा कांबळे यांनी दिली.