भाजप महापाैराकडून नवनगर विकास प्राधिकरण प्रशासनाचा निषेध
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/03/9-5.jpg)
दोन दिवसात उड्डाणपूल नागरिकांसाठी खुला करावा, अन्यथा आंदोलनाचा इशारा
राष्ट्रवादीच्या दबावाखाली येवून प्राधिकरणाने पूल बंद केल्याचा भाजपचा आरोप
पिंपरी |महाईन्यूज|प्रतिनिधी|
पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाने दोन दिवसात साई चाैकातील उड्डाणपूल नागरिकांना वाहतूकीसाठी खुला करावा, अन्यथा भाजपतर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल, तसेच खुला केलेला उड्डाणपुल राष्ट्रवादीच्या दबावापोटी बंद केल्याचा आरोप करीत भाजपच्या महापाैर उषा ढोरे यांनी प्राधिकरण प्रशासनाचा निषेध व्यक्त केला आहे.
यावेळी उपमहापाैर तुषार हिंगे, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, नगरसेवक शत्रुघ्न काटे, विनायक गायकवाड, महिला व बालकल्याण समिती सभापती निर्मला कुटे, नगरसेविका उषा मुंढे, अभिषेक बारणे, नगरसेविका सविता खुळे, नगरसेविका ममता गायकवाड आदी उपस्थित होते.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/03/20200311_120145-1024x576.jpg)
‘पीसीएनटीडी’तर्फे औंध ते काळेवाडी हा साई चौक येथे उभारण्यात आलेल्या पुलाचे महापौर उषा ढोरे यांनी सोमवारी (दि.9) घाईघाईत लोकार्पण करून हा पूल वाहतुकीसाठी खुला केला. परंतु, पुलाचे काम अर्धवट असल्याचे सांगून ‘पीसीएनटीडी’ने मंगळवारी (दि.10) मातीचा ढिगारा टाकून हा पूल पुन्हा बंद केला आहे.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/03/DSC_0012-1024x432.jpg)
पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाकडून औंध ते काळेवाडी रस्त्यावर पुण्यातून काळेवाडी, डांगे चौकाकडे जाणाऱ्या पुलाचे काम अंतिम टप्प्यात आहे. परंतु, पुलाचे काम पूर्ण झाल्याचे सांगून भाजपने मंगळवारी हा पूल वाहतुकीसाठी खुला केला होता. महापौर ढोरे यांच्या हस्ते पुलाचे लोकार्पण करण्यात आले. साई चौक येथे हा पूल उभारण्यात आला आहे. ७०० मीटर लांब आणि आठ मीटर रुंदी असलेल्या या पुलाचे काम अद्याप बाकी असल्याचे सांगून प्राधिकरण प्रशासनाने मंगळवारी पुलाच्या दोन्ही बाजूला मातीचे ढिगारे टाकून हा पूल वाहतुकीसाठी बंद केला.
दरम्यान, प्राधिकरण प्रशासनाने राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या दबावाखाली येवून हा उड्डाणपूल बंद केला आहे. पुलाचे काम पुर्ण होवूनही नागरिकांना खुला केलेला नाही. त्यामुळे येत्या दोन दिवसात उड्डाणपूल नागरिकांना वाहतूकीसाठी खुला करण्यात यावा, अन्यथा भाजपकडून तीव्र आंदोलन करण्यात येईल. त्याशिवाय हा पूल लोकांसाठी खुला केलेला असून भाजपने श्रेय घेत नसल्याचा निर्वाळाही महापाैर ढोरे, पक्षनेते नामदेव ढाके यांनी केला आहे.