भाजप नगरसेवकांना शहराध्यक्षांचा फतवा ; एक महिन्यांचे मानधन पार्टीला जमा करा
पिंपरी – महापालिकेतील सत्ताधारी भाजप नगरसेवकांना शहराध्यक्ष तथा आमदार लक्ष्मण जगताप यांनी फतवा काढला असून एक महिन्याचे मानधन भारतीय जनता पार्टीच्या फंडासाठी जमा करण्याचे आदेश दिले आहेत. त्यांची सर्वस्वी जबाबदारी सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार यांच्यावर सोपविली आहे. त्यामुळे शहर भाजपला सुमारे साडेबारा लाख रुपये पार्टी फंड म्हणून जमा होणार आहे.
पिंपरी – चिंचवड महापालिकेवर राष्ट्रवादी काॅंग्रेसची सत्ता उलथवून भारतीय जनता पार्टीने सत्ता हस्तगत केली आहे. महापालिकेत भाजपचे 77 नगरसेवक आणि स्विकृत 3 असे एकूण 80 नगरसेवक कार्यरत आहेत. त्या सर्व नगरसेवकांना महापालिकेकडून निर्वाह भत्ता म्हणून साधारणता दरमहा 15 हजार रुपये मिळतात. प्रत्येक नगरसेवकांना दरमहा चेकद्वारे किंवा ईसीजीद्वारे प्रत्येकांच्या खात्यात हे मानधन जमा केले जाते.
दरम्यान, भाजपचे शहराध्यक्ष तथा आमदार लक्ष्मण जगताप यांनी भाजपच्या सर्व नगरसेवकांचे एक महिन्याचे मानधन पक्षाकडे फंड म्हणून जमा करण्याचे आदेश दिले आहेत. याबाबत सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार यांच्याकडे हा निधी गोळा करण्याची जबाबदारी सोपविली आहे. त्यानुसार पक्षाच्या बैठकीत सर्व नगरसेवकांना सुचना देवून त्यांचे मानधन गोळा करण्यात येणार आहे. परंतू, हे मानधन पार्टीचे विविध कार्यक्रम, अन्य कार्यालयीन खर्चासाठी एकत्रित करण्यात येणार आहे. या वृत्ताला पक्षनेत्यांनी दुजोरा दिला आहे.