भटकी कुत्री, डूक्कर, जनावरांचा बंदोबस्त करा; पशूवैद्यकीय अधिका-यांची झाडाझडती
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/07/1dogs_5.jpg)
पिंपरी |महाईन्यूज|
शहरात भटक्या कुत्र्यांचा प्रश्न गंभीर झाला आहे. मॉर्निंग वॉकला जायची भीती वाटते. कासारवाडीत तरुणाचा बळी गेला. अशा कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी काय उपाययोजना केल्या जात आहेत?, याची माहिती सर्व पक्षीय नगरसेवकांनी सर्वसाधारण सभेत दिली.
विरोधी पक्षनेते राजू मिसाळ म्हणाले, “कुत्र्याच्या हल्ल्यामुळे कासारवाडीत तरुणाचा बळी गेला. भटक्या कुत्र्यांवर नियंत्रण कसे आणणार.” हर्शल ढोरे म्हणाले, “दररोज किती कुत्र्यांचे निर्बीजीकरण केले जाते.” उषा मुंडे म्हणाल्या, “कुत्री, डुकरे पालन करणाऱ्यांवर कारवाई करावी.” प्रमोद कुटे म्हणाले, “दिवसा कुत्रे सापडत नाहीत, तर रात्री पकडावे.” संदीप वाघेरे म्हणाले, “कुत्रे पकडण्यासाठी एजन्सी नियुक्त करा.” आशा शेंडगे म्हणाल्या, “कासारवाडीतील कर्ता पुरुष गेला. त्याच्या आठ वर्षांच्या मुलाला काय उत्तर देणार. एकदा काही तरी निर्णय घ्या. मनेका गांधी यांच्याशी पत्रव्यवहार करा. पशुवैद्यकीय अधिकारी फोन उचलत नाहीत. त्यांच्यावर काय कारवाई करणार. निर्बीजीकरण केलेले असताना कुत्र्यांची संख्या वाढते कशी?” अशा प्रकारे नगरसेवकांनी धारेवर धरले.
पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अरुण दगडे म्हणाले, “मी फोन घेत असतो.” संगीता ताम्हाणे म्हणाल्या, “कुत्र्यांचा प्रश्न गंभीर झाला आहे.” सचिन चिखले म्हणाले, “डुकरांचाही बंदोबस्त करा.” राहुल कलाटे म्हणाले, “निर्बीजीकरण करणारी संस्था बदला.” पक्षनेते नामदेव ढाके म्हणाले, “कुत्र्यांबाबत लोकांच्या मनात भीती आहे. कोंडवाडा करता येईल का?, याचा विचार करावा.”
अतिरिक्त आयुक्त अजित पवार म्हणाले, “तमिळनाडूचे पथक सोमवारपासून आले आहे. दोन दिवसात चाळीस तीस डुकरे पकडली आहेत. परंतु, या पूर्वी त्यांच्यावर हल्ले झाले होते. त्यामुळे कर्नाटक सीमेपर्यंत बंदोबस्त द्यावा लागेल. कुत्र्यांबाबत बैठक झाली आहे. दीपा बजाज यांच्या संस्थेची मदत घेतली आहे. गेल्या साडेपाच महिन्यात साडेबारा हजार कुत्र्यांचे निर्बीजीकरण केले आहे. महिन्याला अडीच हजार निर्बीजीकरण करण्याचे उद्दिष्ट आहे. तीन महिन्यांत चांगला रिपोर्ट मिळेल. शहरात 80 हजार कुत्री आहेत.”