बोपखेलमध्ये डास मारण्याची मशिन
![Along with Corona, now dengue and chikungunya have also increased anxiety, the number of patients has tripled in the state!](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/dengue.jpg)
पिंपरी – बोपखेल परिसरात मुळा-मुठा या नद्यांच्या संगमावर मोठ्या प्रमाणावर जलपर्णी वाढल्यामुळे डासांनी या परिसरात थैमान घातले आहे. यावर उपाययोजना म्हणून महापालिका प्रशासनाने नागरिकांची मागणी लक्षात घेत डास मारणारी मशिन बसवली आहे.
यामुळे डासांचे प्रमाण कमी होऊन नागरिकांना त्रास होणार नाही, अशी अपेक्षा महापालिका बाळगत आहे. नदीमध्ये वाढलेल्या जलपर्णीमुळे डासांची उत्पत्ती झाली असून पाणी सुद्धा दूषित झाले आहे. डासांमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असल्याचे दिघी-बोपखेल प्रभागाच्या नगरसेविका हिराबाई घुले यांनी महापालिकेच्या निदर्शनात आणून दिल्यावर महापालिकेने यावर उपाययोजना केली.
एवढ्या मोठ्या प्रमाणातील डास ही मशिन कशी मारणार? असा प्रश्न नागरिक विचारु लागले आहेत. नदीपात्रातून जलपर्णी काढणे हेच सर्व समस्येवरील उत्तर असल्याचे नागरिकांचे म्हणणे असून जलपर्णी काढण्यात यावी, अशी नागरिक मागणी करत आहेत.