बोगस विद्यापीठ चालकांवर होणार फौजदारी कारवाई
पुणे – राज्यातील नियमबाह्य पदव्या देणार्या शैक्षणिक संस्था आणि बोगस विद्यापीठांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर फौजदारी कारवाई करणार आहे. यामध्ये कोणालाही पाठीशी घालणार नसून ज्यांच्या तक्रारी प्राप्त आहेत. ज्यांना नियमबाह्य पदव्या दिल्या गेल्या आहेत. त्यांनी उच्च शिक्षण संचालनालयात येऊन तक्रार द्यावी अशी माहिती उच्च शिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ.धनराज माने यांनी दिली आहे.
डॉ. माने म्हणाले, महाराष्ट्र कृषी, पशु, मत्स्य विज्ञान, आरोग्य विज्ञान, उच्च तंत्रज्ञान व व्यवसाय शिक्षण यांमधील अनधिकृत संस्था व अनधिकृत अभ्यास पाठ्यक्रम अधिनियम 2013 या अधिनियमाच्या प्रयोजनार्थ दि.7 नोव्हेंबर 2013 ला अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार उच्च शिक्षण व तंत्र शिक्षण यांमधील शिक्षण संस्था व अभ्यासक्रम यासाठी उच्च शिक्षण संचालनालयाचे संचालक तसेच तंत्र शिक्षण संचालनालयाचे संचालक यांना सक्षम अधिकारी म्हणून घोषित केले. त्यामुळे त्यांना कारवाई करण्याचे थेट अधिकार मिळाले आहेत. असेही सांगितले.