बेरोजगार तरुणासाठी राष्ट्रवादी युवकांचे हटके आंदोलन, गोळ्या-बिस्किटे विकून सरकारचा निषेध
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/02/IMG-20190213-WA0005.jpg)
तरुणांनी वडापाव तळून, चहा बनवून आणि सायकलवर गोळ्या-बिस्किटे विकून भाजपचा निषेध
पिंपरी ( महा ई न्यूज ) – ‘नोटाबंदी करुन वार, लाखो तरुणांना केले बेरोजगार’, ‘मोदी सरकारचा अजब कारभार- कामे कमी आणि जाहिरात फार’, ‘वर्षे झाले साडेचार आणि नुसत्या घोषणांचा बाजार’, अशा विविध घोषणा देवून राष्ट्रवादी युवक काॅंग्रेसच्या वतीने आकुर्डी अप्पर तहसिल कार्यालयासमोर आज (बुधवार) बेरोजगार तरुणांचे आंदोलन करुन भाजप सरकारचा निषेध नोंदविण्यात आला. यावेळी तहसिलदारांना निवेदनही देण्यात आले.
या आंदोलनास राष्ट्रवादी शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील, विरोधी पक्षनेते दत्ता साने, महिला अध्यक्षा वैशाली काळभोर, कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, नगरसेवक नाना काटे, युवा नेते संदीप पवार, नगरसेवक मयुर कलाटे, युवक अध्यक्ष विशाल वाकडकर, विद्यार्थी अध्यक्ष सुनिल गव्हाणे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी संजोग वाघेरे-पाटील म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकांना स्वप्ने दाखविली, वर्षाला दोन कोटी रोजगार उपलब्ध करु, असे आमिष जनतेला दाखविले. परंतू, दोन लाखही नोक-या उपलब्ध केल्या नाहीत. भाजप सरकारने बेरोजगार युवकांच्या प्रश्नांवर गार्भियाने विचार करायला हवा, त्या घोषणा पोकळ ठरल्या आहेत. बेरोजगारांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालला आहे. नोटाबंदी, जीएसटीने अनेक कंपन्याचे कंबरडे मोडले आहे. त्यामुळे लाखो तरुण रस्त्यावर आले आहेत म्हणून बेरोजगार तरुणासाठी आम्ही रोजगार द्या, याकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन केले आहे.
युवा नेते संदीप पवार म्हणाले की, बेरोजगार तरुणाच्या व्यथांकडे लक्ष वेधण्यासाठी पदवीधर युवकांचा वेशपरिधान करुन भाजप सरकारचा मी निषेध व्यक्त करतो. गेल्या 45 वर्षात एवढी बेरोजगारी वाढली नव्हती, त्याहून कित्येक पटीने भाजप सरकारच्या काळात बेरोजगारी वाढल्याने हा अहवाल दडपण्यात आला. तरीही माध्यमांनी तो प्रसिध्द केल्याने त्या आकडेवारीवरुन बेरोजगारीचे भीषण वास्तव जगासमोर आले आहे. सरकारने दोन कोटी नव्हे तर दोन हजारही नोक-या उपलब्ध केल्या नसल्याने हे भाजपचे फेकू सरकार अपयशी ठरले आहे. मात्र, तरुणांना रोजगार देण्यास अपयश आल्याने तरुणांचे लक्ष अन्यत्र वळविण्यासाठी हिंदुत्वाच्या मुद्द्यांवरुन तरुणाची माथी भडकाविण्याचा प्रयत्न हे सरकार करीत आहे. प्रत्येकजण हिंदूच असून धार्मिक व कट्टरवाद्यांवर तरुणांचे लक्ष अन्यत्र वळविण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे या भाजप सरकारला सत्तेवरुन उलथवून टाकल्याशिवाय गप्प बसायचे नाही, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.