बेपत्ता झालेले दोन्ही कुटुंब अखेर सापडले
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/08/FAMILY.jpg)
पुणे – पानशेत येथे बेपत्ता झालेले पुण्यातील मगर आणि सातव कुटुंबीय अखेर सापडले आहेत. दोन्ही कुटुंब हवेली तालुक्यातच असून पोलिसांनी त्यांचा शोध घेतला. मोबाईलला नेटवर्क नसल्याने त्या कुटुंबाशी संपर्क होऊ शकला नाही, अशी माहिती समोर आली आहे.
हडपसर येथे राहणारे सिद्धार्थ सदाशिव मगर, त्यांची पत्नी स्नेहल मगर, आरंभी आणि सायली या जुळ्या मुलींसह खडकवासला येथे फिरायला गेले होते. मगर कुटुंबीयांसोबत जगन्नाथ सातव, त्यांची पत्नी आणि मुलगा देखील तिथे गेले होते. दोन्ही कुटुंब खडकवासला येथील हॉ़टेलमध्ये मुक्कामी होते. मात्र, बुधवारपासून दोन्ही कुटुंबाशी संपर्क होऊ शकलेला नाही. त्यांचा मोबाईल फोन देखील बंद होता. अखेर याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली. या प्रकरणी हवेली पोलिसांनी तपासाला सुरुवात केली.
सातव आणि मगर कुटुंबीय पानशेत येथील शिरकाई मंदिरात गेले होते. तिथे मोबाईलला रेंज नसल्याने फोन लागत नव्हता. बुधवारी रात्री दोन्ही कुटुंबांनी शिरकाई मंदिरातच मुक्काम केला. सकाळी हॉटेलमध्ये परतल्यावर मोबाईलला रेंज आली आणि दोन्ही कुटुंबाशी संपर्क साधता आला. दोन्ही कुटुंब हडपसरला परतण्यासाठी निघाले आहेत, अशी माहिती त्यांची नातेवाईक निलेश मगर यांनी दिली.