बेताल वक्तव्य प्रकरणी मंत्री रावसाहेब दानवेंच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध
शिवसेना भोसरी विधानसभेच्या वतीने आंदोलन
पिंपरी | प्रतिनिधी
केंद्रींय मंत्री रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यांचा अवमान करणारे वक्तव्य केले आहे. शेतकरी आंदोलनाला चीन आणि पाकिस्तानचा हात असल्याच्या त्यांच्या वक्तव्याचा शिवसेनेच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला आहे. शिवसेना भोसरी विधानसभेच्या वतीने त्यांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध व्यक्त केला.
जिल्हा संघटिका सुलभा उबाळे, विधानसभा प्रमुख धनंजय आल्हाट, उपजिल्हाप्रमुख निलेश मुटके, उप शहरप्रमुख अनिल सोमवंशी, युवा सेना जिल्हाधिकारी सुरज लांडगे, सचिन सानप, समन्वयक अंकुश जगदाळे, दादा नरळे, सर्जेराव भोसले, विभाग प्रमुख सतीश दिसले, गणेश इंगवले, सतीश मरळ, शाखाप्रमुख आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
केंद्र सरकारने लागू केलेल्या नव्या विधेयकाविरोधात देशातील शेतकरी आंदोलन करून निषेध व्यक्त करत आहे. दिल्ली येथे शेतकरी ठिय्या मांडून बसले आहेत. ८ डिसेंबर रोजी देशव्यापी संपही पुकारण्यात आलं होता. या मध्ये महाराष्ट्रासह पिंपरी चिंचवड मधीलही भाजप वगळता इतर सर्व पक्ष सहभागी झाले होते. शेतकऱ्यांच्या या आंदोलनावर सकारात्मक तोडका काढणे गरजेचे आहे. मात्र तसे न होता केंद्र सरकार मधील मंत्री व भाजप पदाधिकारी बेताल वक्तव्य करून अवमान करताना दिसत आहेत. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी तर या आंदोलनाला चीन आणि पाकिस्तानचा पाठींबा असल्याचे वादग्रस्त वक्तव्य केले. त्यांच्या या वक्तव्याच्या विरोधात तीव्र आंदोलन केले जात आहे.
त्याच्याच एक भाग म्हणून शिवसेना भोसरी विधानसभेच्या वतीने मंत्री रावसाहेब दानवेंच्या प्रतिमेला जोडे मारून जाहीर निषेध केला.