breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

बेकायदेशीर गावठीकट्टा बाळगला; चाकणच्या नगरसेवकाला सापळा रचून अटक

अहमदनगर – बेकायदेशीररित्या गावठी कट्टा बाळगणार्‍या चाकण येथील एका नगरसेवकासह आणखी एका आरोपीला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अटक केली. त्यांच्याकडून एक देशी बनावटीचा गावठी कट्टा, देशी बनावटीच्या पिस्टलचे मॅगझीन, दोन जिवंत काडतूसं, दोन मोबाईल आणि फॉरच्युनर कार असा एकूण २० लाख ५८ हजार रूपयाचा ऐवज जप्‍त करण्यात आला. आरोपी राहुल किसन कांडगे हा चाकण येथील नगरसेवक असून त्याच्याविरुध्द यापूर्वी चाकण पोलीस ठाण्यात ५ गंभीर गुन्हयांची नोंद आहे.

राहुल किसन कांडगे (वय ३६ वर्ष), अश्पाक महमंद शेख (वय ३४ वर्ष) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. स्थानिक गुन्हे शाखेतील काही पोलीस अधिकारी हे गस्तीवर असतानाच त्यांना काही पोलीस सूत्रांकडून बेकायदेशीर गावठी कट्ट्याविषयी माहिती मिळाली. त्यामुळे अजिबात वेळ न दवडता  पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी तात्काळ सापळा रचला.

यावेळी मनमाड-नगर रोडवरून नगरच्या दिशेने जाणार्‍या एका पांढर्‍या रंगाच्या फॉर्च्युनर गाडीमधील व्यक्‍तीकडे गावठी कट्टा असल्याची खात्रीलायक माहिती पोलिसांना मिळालेली असल्याने त्यांनी अतिशय चाणक्षपणे विळद घाट, निंबळक बायपास चौक या परिसरामध्ये सापळा रचला.

पोलिसांनी रचलेल्या या सापळ्यात नगरसेवक राहुल कांडगे हा अलगद सापडला. पोलिसांनी गाडी पकडताच त्याची पंचासमक्षच झडती देखील घेण्यात आली. यावेळी गाडीमध्ये देशी बनावटीचे पिस्टल (गावठी कट्टा), मॅगझीन आणि दोन जिवंत काडतूस आढळून आली. पोलिसांनी फॉर्च्युनर कारसह सगळी शस्त्र जप्‍त करत दोघांविरूध्द एमआयडीसी पोलीस ठाण्यात बेकायदेशीरपणे शस्त्रास्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई पोलिस अधिक्षक ईशू सिंधु, अप्पर अधीक्षक सागर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.

अहमदनगरमध्ये गुन्हे वाढत असल्याने ते रोखण्यासाठी पोलिसांसमोर मोठं आव्हान आहे. त्यामुळे सुरूवातीलाच गुन्हेगारांना आळा घालण्याचे प्रयत्न आता पोलिसांकडून सुरू झाले आहेत. दुसरीकडे एका नगरसेवकाला अशा पद्धतीने अटक करण्यात आल्याने मोठी खळबळ माजली आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button