बांधकाम कामगारांना ‘यशदा’कडून 21 दिवस पुरेल इतके धान्य वाटप
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/03/e725c9b3-ca98-48b1-82d3-0a26c6691e7f.jpg)
पिंपरी| महाईन्यूज| प्रतिनिधी
संपूर्ण जगभरात कोरोना या विषाणूच्या प्रादूर्भावाने मोठ्या प्रमाणात जिवीतहानी होत आहे. त्यामुळे राज्य सरकारनेे या विषाणूचा प्रसार होऊ नये या कारणास्तव संपूर्ण महाराष्ट्र राज्यात संचारबंदी लागू केली आहे, हे अतिशय गरजेचे होते. परंतु, शहरात मोठ्या प्रमाणावर बांधकाम कामगार असून, त्यांचा उदरनिर्वाह रोजंदारीवर आहे.
या बाबतीत पिंपळे सौदागर येथील ‘ यशदा रियल्टी ग्रुप ‘ या बांधकाम समुहातील आघाडीच्या कंपनीने आपल्या सर्व बांधकाम गृहप्रकल्पावरील रोजंदारीवर काम करणाऱ्या काही हजारांमध्ये असणाऱ्या बांधकाम कामगारांसाठी पुढाकार घेऊन एकवीस दिवस पुरेल इतके धान्य व किराणा मालाचे वाटप केले आहे.
या बाबतीत बोलताना संस्थेचे अध्यक्ष वसंत काटे व उपाध्यक्ष संजय भिसे म्हणाले की, कोरोना विषाणूमुळे आपल्या देशावर संकट आले आहे. राज्यभरात संचारबंदी लागू केली असल्याने शहरातील बांधकाम व्यवसाय संपूर्णपणे बंद आहेत. त्यामुळे या कामगारांना रोजचा पगार न मिळाल्यामुळे त्यांच्यावर व त्यांच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली आहे. अश्या कठीण समयी संस्थेने ‘एक हात मदतीचा’ पुढे करीत संस्थेच्या सर्व बांधकाम प्रकल्पांवर काम करणाऱ्या बांधकाम कामगारांना अन्नधान्याचे वाटप केले आहे. जेणेकरून ते पुढील काही दिवस उपाशी न राहता स्वतःसकट कुटुंबियांची गुजराण करू शकतील.