प्रियकराच्या साथीने मुलीने केली आईला मारहाण ; सांगवीतील घटना
![Torture of a young woman on the basis of a pornographic photograph](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/06/rape-l.jpg)
पिंपरी – प्रियकराच्या साथीने मुलीने आईला शिवीगाळ करीत लाकडी दांडक्याने मारहाण केली. एवढेच नव्हे, तर आरोपीने प्रेयसीच्या आईचा विनयभंग केल्याचा हा धक्कादायक प्रकार नवी सांगवीत शुक्रवारी २२ जूनला दुपारी अडीचच्या सुमारास घडला. सांगवी पोलिसांकडे याप्रकरणी फिर्याद दाखल झाली असून, दोघांना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी संतोष भारत तायडे (वय २४, रा. आंबेडकरनगर, विक्रोळी, मुंबई) तसेच त्याच्या मैत्रिणीला अटक करण्यात आली. याबाबत ४३ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे.
सांगवीत राहणाऱ्या संबंधित तरुणीचे लग्न झाले होते. परंतु, ती नव-याबरोबर राहत नव्हती. आरोपी संतोष तायडे याच्याशी तिचा कायम संपर्क होता. शुक्रवारी आरोपी संतोषला घेऊन ती सांगवीत आईकडे आली होती. पैशाच्या देवाण-घेवाणीवरून तरुणीचे आईबरोबर भांडण झाले. त्याचे पर्यावसान हाणामारीत झाले. आरोपी संतोष आणि तरुणीने महिलेला ‘तुला बघून घेतो’ असे म्हणत लाकडी दांडक्याने मारहाण केली. आरोपी संतोषने फिर्यादी महिलेला ‘आपण पोलीस अधिकारी आहोत’ असे भासवत शिवीगाळ केली. तसेच मनात लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले. पोलिसांनी दोन्ही आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सांगवी पोलीस अधिक तपास करीत आहेत.