‘प्रधानमंत्री आवास योजने’चा अर्ज करताना पाच हजार रुपयाचे शुल्क रद्द करा – सतीश कदम
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/रमाई-आवास-योजना-768x575.jpg)
पिंपरी |महाईन्यूज|प्रतिनिधी
प्रधानमंत्री आवास योजनेसाठी ऑनलाइन अर्ज भरतांनाची पाच हजार रुपयांचा डिमांड ड्राफ्ट भरण्याची रक्कम रद्द करून ती निशुल्क करावी अशी मागणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रुपचे अध्यक्ष सतीश कदम यांनी महापालिकेकडे केली आहे.
याबाबत आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यात कदम यांनी म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने पंतप्रधान आवास योजनेसाठी 15 ऑगस्टपासून नागरिकांचे ऑनलाईन अर्ज स्वीकारण्यास सुरूवात केली आहे.
च-होली, बो-हाडेवस्ती, रावेत येथे 3 हजार 664 घरे उपलब्ध होणार आहेत. या योजनेसाठी ऑनलाइन अर्ज भरतांना पाच हजार रुपयांचा डिमांड ड्राफ्ट भरणे बंधनकारक आहे. प्रत्येकाला हक्काचे घर देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून त्याची पूर्तता केली जात आहे. मात्र, कोरोना व्हायरसमुळे अनेकांनी लोकांनी आपल्या नोकर्या गमावल्या आहेत. हातावर पोट असणाऱ्यांचे तर या काळात प्रचंड हाल झाले. दोन वेळच्या जेवणाचे ही त्यांचे हाल होत आहे.
त्यामुळे प्रधानमंत्री आवास योजनाची फॉर्म भरतानाची रक्कम कमी करून ती निशुल्क करण्यात यावी. सध्या ही रक्कम पाच हजार रूपये असल्याने आर्थिकदृष्या दुर्बल घटकातील नागरिकांसाठी सध्या कोरोनासारख्या महामारीच्या काळात पाच हजार रूपये भरणे शक्य नाही. यामुळे आर्थिकदृष्या दुर्बल घटकातील नागरिक या योजने पासून वंचित राहू नयेत. यासाठी ही रक्कम कमी करून नागरिकांना दिलासा देण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.