पोलीस संचालक, पोलीस आयुक्त, जिल्हाधिकारी यांना सुनावनीस हजर राहण्याचे आदेश
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/12/EM8ULKWU0AALO2I-2.jpg)
- राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाने दिले आदेश
- माजी आमदार गौतम चाबुकस्वार यांची माहिती
पिपंरी | महाईन्यूज | प्रतिनिधी
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या मतदानादिवशी पिंपरी कॅम्पात माजी आमदार गौतम चाबुकस्वार आणि नगरसेवक डब्बू आसवानी यांच्या कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ हाणामारी झाली होती. याप्रकरणात केलेल्या तक्रारीवरून राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाने महाराष्ट्र राज्य पोलिस महासंचालक पिंपरी-चिंचवडचे पोलिस कमिशनर आणि पुणे जिल्हाधिकारी यांना ९ जानेवारी २०२० रोजी होणा-या सुनावणीस उपस्थित रहावे, असे आदेश दिले आहेत, अशी माहिती माजी आमदार गौतम चाबुकस्वार यांनी पत्रकार परिषदेत आज दिली.
महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणूकीच्या दिवशी पिंपरी कॅम्पमध्ये दोन गटात भांडण झाले होते. यानंतर झालेल्या पोलिस तक्रारीत पोलिसांनी धर्मेंद्र उर्फ बबलू ब्रिजलाल सोनकर आणि इतरांवर गुन्हे दाखल केले. याबाबत सोनकर यांनी राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाकडे पोलिस कमिशनर यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. यानंतर ५ डिसेंबर २०१९ च्या झालेल्या सुनावणीनंतर राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे सदस्य डॉ. स्वराज विव्दान यांनी असा आदेश काढला आहे.
या आदेशात त्यांनी म्हटले आहे कि, पुढील सुनावणी ९ जानेवारी २०२० रोजी दुपारी दोन वाजून 40 मिनिटांनी होणार आहे. उपस्थित रहावे आणि अनुसूचित जाती वर्गातील एस्पी दर्जाच्या वरिष्ठ अधिका-यांच्या मार्फत या घटनेचा तपास पुन्हा करावा. आणि तसा कार्य अहवाल पंधरा दिवसात सादर करवा. स्मिता पाटील (डीएसपी), राम जाधव (एसीपी), आणि शंकर बाबर (सिनिअर इन्सपेक्टर) यांची पुणे जिल्हा बाहेर बदली करावी, असे आदेशात नमुद केले आहे, अशी माहिती माजी आमदार गौतम चाबुकस्वार यांनी दिली.
रविवारी (दि. 29 डिसेंबर) माजी चाबुकस्वार यांनी पिंपरी येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे महाराष्ट्र राज्य माजी समन्वयक धर्मेंद्र उर्फ बबलू सोनकर, आरपीआयचे (आठवले) शहराध्यक्ष सुरेश निकाळजे, शिवसेना शहर संघटक माधव मुळे आदी उपस्थित होते.