पोलीस आयुक्तालयातील कर्मचाऱ्यांचा पगार रखडला
पिंपरी – पिंपरी-चिंचवड आयुक्तालयातील पोलिस कर्मचाऱ्यांचे मागील तीन महिन्यांपासून पगार रखडले आहेत. त्यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांना आर्थिक चटके बसू लागले आहेत.
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाला स्थापनेपासून अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. कर्मचाऱ्यांची अपुरी संख्या, आयुक्तालयास जागेचा अभाव, आयुक्तालयाचे फोन बिलाचा प्रश्न, वाहने यासह अन्य सोयी- सुविधांचा अभाव होता. त्यामुळे आयुक्तालयाच्या गतीमान कारभाराला चाप बसला होता. सध्यस्थिती पोलिस आयुक्तालयातील कार्यालयीन कर्मचाऱ्यांचे वेतन व भक्ते वेळेवर मिळत नाहीत. यामुळे पोलिस कर्मचारी त्रस्त आहेत. वेतन न मिळाल्याने अनेक समस्या आणि अडीअडचणीला सामोरे जावे लागत आहे.
दरम्यान, पुणे पोलिस आयुक्तालयातून पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाचे डिटॅच-अटॅच होण्यासाठी विलंब झाल्याने कर्मचाऱ्यांच्या वेतनाची अडचण होती. नऊ पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांचे पगार रखडले होते. सोमवारी त्या सर्व पोलिस ठाण्याचे पगार झाले आहे. अपवादात्मक स्थितीत काही कर्मचाऱ्यांचे वेतन राहिले आहे. त्याबाबत प्रशासकीय पातळीवर पाठपुरावा सुरू आहे. कर्मचाऱ्यांचा पाचवा आणि सहावा वेतन आयोगाचा फरक देखील आताच्या वेतनासोबत कॅरी फॉरवर्ड केला आहे. अपवादात्मक स्थितीत राहिलेल्या कर्मचाऱ्यांचेही वेतन आज होईल, अशी माहिती सहाय्यक पोलिस आयुक्त (प्रशासन) श्रीधर जाधव यांनी दिली.