breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पोलिस आयुक्तालय इमारत, एसटी बसस्थानक, पर्यटन क्षेत्रासाठी निधी द्या – आ. लक्ष्मण जगताप

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयासाठी सुसज्ज इमारत बांधणे, पिंपरी-चिंचवडसह मावळ तालुक्यातील विविध भागात पर्यटन क्षेत्र विकसित करणे, मावळ तालुक्यातील किल्ल्यांचे संवर्धन, चिंचवड विधानसभा मतदारसंघात एसटी महामंडळाचे बसस्थानक आणि आगार उभारणे, मतदारसंघातील व्यायामशाळा व तालमींना अत्याधुनिक क्रीडा साहित्य व ओपन जिम उपलब्ध करणे तसेच मोरवाडी येथील नवीन बांधण्यात येणाऱ्या दिवाणी व सत्र न्यायालयात आवश्यक पदांच्या निर्मितीसाठी आमदार लक्ष्मण जगताप यांनी अधिवेशनात सरकारकडे आवश्यक निधीची मागणी केली आहे. त्यावर उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी सभागृहात मंगळवारी (दि. ३) पुरवणी विनियोजन विधेयक मंजूर करताना उत्तर दिले. आमदार लक्ष्मण जगताप यांनी उपस्थित केलेले मुद्दे मार्गी लावण्यासाठी व निधी उपलब्धतेसाठी चालू अधिवेशना दरम्यान सविस्तर बैठक घेण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे.  

चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार लक्ष्मण जगताप यांनी अधिवेशनात शहरासह आपल्या मतदारसंघातील अनेक प्रलंबित प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधले आहे. उद्योगनगरी पिंपरी-चिंचवड शहरासाठी स्वतंत्र पोलिस आयुक्तालयाची निर्मिती करण्यात आली आहे. या पोलिस आयुक्तालयांतर्गत सुमारे अडीच हजार पोलिस कर्मचारी कार्यरत आहेत. परंतु, हे पोलिस आयुक्तालय पिंपरी-चिंचवड महापालिका मालकीच्या इमारतीत भाडेतत्त्वावर अपुऱ्या जागेत सुरू आहे. तसेच वाहतूक व इतर विभाग शहरात अन्य ठिकाणच्या इमारतीत कार्यरत आहेत. पोलिस आयुक्तालय असूनही जागेअभावी सायबर क्राईम विभाग, एटीएस, आरसीपी, क्यूआरटी हे विभाग कार्यरत करण्यात आले नाहीत. त्यामुळे पोलिस आयुक्तालयाचे मुख्यालय सुसज्ज जागेत उभारण्याची आवश्यता आहे. ही प्रशासकीय इमारत उभारण्यासाठी निधीची आवश्यकता आहे. त्यासाठी आमदार लक्ष्मण जगताप यांनी अधिवेशनात सरकारकडे निधीची मागणी केली असून, त्याबाबत तातडीची उपाययोजना व कार्यवाहीबाबत सरकारकडे विचारणा केली आहे.

पिंपरी-चिंचवड शहर ही उद्योगनगरी असल्यामुळे या शहरात मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, कोकण, पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील नागरिक चिंचवड विधानसभा मतदारसंघातील सांगवी, पिंपळेगुरव, नवी सांगवी, पिंपळेसौदागर, रहाटणी, वाकड, पुनावळे, हिंजवडी, किवळे, रावेत, हिंजवडी आयटी पार्क या भागात नोकरी, व्यवसाय व शिक्षणानिमित्त मोठ्या संख्येने वास्तव्याला आहेत. या नागरिकांना आपल्या मूळगावी जाण्यासाठी एसटी बसने प्रवास करावा लागतो. शहरात वल्लभनगर येथे एसटी महामंडळाचे बसस्थानक आहे. परंतु, चिंचवड विधानसभा मतदारसंघातील नागरिकांना या बसस्थानकावर जाण्यासाठी अनेक तास वाया घालवावे लागतात. त्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. त्यामुळे नागरिकांची होणारी ही गैरसोय व भुर्दंड टाळण्यासाठी पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या वाकड, थेरगाव किंवा रहाटणी येथील एखाद्या मोकळ्या भूखंडावर नवीन एसटी बस स्थानक आणि आगार निर्माण करण्याची नागरिकांची मागणी आहे. त्यानुसार आमदार लक्ष्मण जगताप यांनी अधिवेशनात सरकारकडे निधीची मागणी केली आहे.

पिंपरी-चिंचवडमधील अप्पूघर, दुर्गादेवी टेकडी व अन्य भागात पर्यटन क्षेत्र विकसित करता येणे शक्य आहे. त्यासाठीही आमदार लक्ष्मण जगताप यांनी सरकारकडे अधिवेशनात निधीची मागणी केली आहे. त्याचप्रमाणे मावळ तालुक्यातील कार्ला येथील श्री एकविरा देवी देवस्थान, लोणावळा, खंडाळा, पवना डॅम, भुशी डॅम, श्री क्षेत्र देहू, श्री क्षेत्र आळंदी याठिकाणी पर्यटन क्षेत्र विकसित करणे तसेच मावळ तालुक्यातील लोहगड व तिकोना किल्ल्याच्या संवर्धनासाठीही आमदार जगताप यांनी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी सरकारकडे केली आहे. तसेच मोरवाडी येथे नवीन बांधण्यात येणाऱ्या दिवाणी व सत्र न्यायालयाला आवश्यक पदांच्या निर्मितीसाठी तातडीने उपाययोजना व कार्यवाही करण्याची मागणीही त्यांनी अधिवेशनात सरकारकडे केली आहे. त्याचप्रमाणे चिंचवड विधानसभा मतदारसंघातील व्यायामशाळा व तालमींना अत्याधुनिक क्रीडा साहित्य व ओपन जिम उपलब्ध करून देण्यासाठी सरकारने तातडीने निधी उपलब्ध करून द्यावा, अशीही मागणी आमदार जगताप यांनी केली आहे.

आमदार लक्ष्मण जगताप यांनी विविध विकासकामांसाठी मागितलेल्या निधीबाबत उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी अधिवेशनात पुरवणी विनियोजन विधेयक मंजूर करताना उत्तर दिले. आमदार जगताप यांनी उपस्थित केलेले प्रश्न मार्गी लावण्यासाठी व निधी उपलब्धता करून देण्यासाठी चालू अधिवेशना दरम्यान संबंधित अधिकाऱ्यांची सविस्तर बैठक घेण्याचे आश्वासन सभागृहात दिले आहे.     

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button