पोलिसांनो शहरातले टोळीयुध्द संपवा, महिलांच्या सुरक्षेसाठी सतर्क रहा
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/10/DSC_8175.jpg)
- भाजप पदाधिकारी, नगरसेवकांची पोलिसांसोबत बैठक
- पदाधिकारी, नगरसेवकांनी मांडले गंभीर मुद्दे
पिंपरी, (महा-ई-न्यूज) – शहरातील वाढती गुन्हेगारी, अवैध धंदे, महिला-मुलींवरील अत्याचार आणि टोळी युध्दासारख्या गंभीर घटना घडू नयेत यासाठी पोलिसांनी सतर्क राहून कायदा व सुव्यवस्था अबाधीत ठेवण्याचे कार्य करावे. महाविद्यालयीन विद्यार्थिनींच्या सुरक्षितेसाठी कॉलेज परिसरात पेट्रोलिंग वाढवावी, पोलिसांनी हद्दीचा वाद न घालता नागरिकांना रात्री-अपरात्री भिती वाटणार नाही, असे वातावरण तयार करण्यात यावे, अशा विविध मागण्या नगरसेवकांनी केल्या.
शहरातील वाढत्या गुन्हेगारीचा गंभीर प्रश्न निर्माण झाल्यामुळे सर्वपक्षीय नगरसेवकांनी पोलिसांसोबत चर्चा करून प्रश्न सोडविण्यासाठी बैठक आयोजित करण्याची मागणी गेल्या सर्वसाधारण सभेत केली होती. त्यावर पोलिसांच्या वेळेनुसार आज बुधवारी (दि. 17) चिंचवड येथील अटो क्लस्टर याठिकाणी बैठक पार पडली. या बैठकीला महापौर राहूल जाधव, पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन, पक्षनेते एकनाथ पवार, स्थायी समिती सभापती ममता गयाकवाड, उपमहापौर सचिन चिंचवडे, विरोधी पक्षनेते दत्ता साने, शिवसेना गटनेते राहूल कलाटे, मनसे गटनेते सचिन चिखले, अपक्ष आघाडी गटनेते कैलास बारणे, विविध पक्षाचे नगरसेवक, पोलीस अधिकारी, कर्मचारी आदी उपस्थित होते.
गेल्या काही महिन्यांपासून शहरात महिलांच्या छेडछेडीचे प्रकार घडत आहेत. मुलींवरील अत्याचाराच्या गंभीर घटना घडू लागल्याने त्यांच्या सुरक्षितेचा प्रश्न निर्माण झाला आहे. गुन्हेगार लापता होत असल्याने पीडितांच्या कुटुंबियांना न्याय मिळत नसून पोलिस आणि कायद्याबाबत अविश्वासाची भावना नागरिकांच्या मनामध्ये निर्माण होत आहे. शहराच्या काही भागांमध्ये खुलेआम मटक्याचे धंदे सुरू आहेत. जुगार आड्डे चालविले जात आहेत. नशा करण्याचे प्रमाण लहान वयातील मुलांमध्ये वाढत आहे. त्यामुळे 10, 12, 18 वयातील मुले गुन्हेगारीकडे वळू लागली आहेत. त्यांना वेळीच रोखण्याची गरज आहे. मुलींना रोडरोमिओंच्या त्रासाला बळी पडावे लागत आहे. पोलिसांनी कॉलेज परिसरात पेट्रोलींग वाढवावे. शहरात शांततेचे व सुरक्षीत वातावरण तयार करण्याची जबाबदारी पार पडावी, अशा विविध मागण्या नगरसेवकांनी बैठकीत केल्याची माहिती विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी दिली.
पोलिसांनी हद्दीचा वाद न घालता नागरिकांना कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही, याची काळजी घ्यावी. बेकायदेशीर प्रवासी वाहतुकीला आळा घालावा. गुटखा बंदीची कडक अंमलबजावणी करावी. पोलिसांना आवश्यक साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी पालिका मदत करायला तयार आहे. यापलीकडे जाऊन शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊन मनुष्यबळाचा प्रश्न देखील सोडविण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जातील.
एकनाथ पवार, सत्तारुढ पक्षनेते
कुदळवाडी ते आयुक्त बंगला, काळेवाडी फाटा ते देहू-आळंदी बीआरटी मार्ग, खंडोबा माळ ते साने चौक, निगडी ते दापोडी या मार्गावरील बेकायदेशीर रिक्षा चालकांना आवर घालावा. पोलिसांच्या वसुली कर्मचा-यांना नियंत्रणात ठेवावे. चिंचवड स्टेशन येथील पिंपरी पोलिसांच्या “नाकासमोरून” मुंबईला होणारी अवैध प्रवासी वाहतूक बंद करावी. यशवंतराव चव्हाण रुग्णालयात आलेल्या मृताचा पंचनामा वायसीएममधील पोलिसांनीच करावा. हद्दीचा वाद न घालता नागरिकांच्या सेवेसाठी काम करावे.
दत्ता साने, विरोधी पक्षनेते