‘पूजापाठ’नंतर ट्रोल झालेले राष्ट्रवादीचे विरोधी पक्षनेते राजू मिसाळ यांचा प्रसिध्दीसाठी नवा ‘स्टंट’

- ‘पीपीई’ किट घालून कोविड सेंटरमध्ये रुग्णांची घेतली भेट
- सेंटरमधील किरकोळ चुका काढून कोरोना योध्यांचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न
पिंपरी | महाईन्यूज | विशेष प्रतिनिधी
राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांची पुरोगामी विचारांची चळवळ पायदळी तुडवून महापालिकेतील कार्यालयाची पूजा घातल्याने राज्यभरात बदनाम झालेल्या नवनियुक्त विरोधी पक्षनेत्याने यावर पडदा टाकण्यासाठी केविलवाना प्रयत्न केला आहे. कोविड सेंटरमध्ये लोकप्रतिनिधींना प्रवेश नाकारण्याचा आयुक्तांचा आदेश डावलून राजू मिसाळ यांनी कोविड सेंटरमध्ये बेधडक प्रवेश करून बाधीत रुग्णांची विचारपूस केली. काल कार्यालयात पूजापाठ केल्यानंतर झालेली बदनामी पुसून टाकण्यासाठी मिसाळ यांचा हा ‘स्टंट’ असल्याची चर्चा महापालिका वर्तुळात सुरू आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेतील विरोधी पक्षनेते पदावर राजू मिसाळ यांची नुकतीच निवड झाली. पालिकेतील राष्ट्रवादीच्या कार्यालयाला अपशकुनी ठरवून त्यांनी पूजापाठ विधी घातला. भटजीद्वारे मंत्रोच्चार करून शाही थाटात पूजाअर्चा केली. गणपतीची प्राणपतिष्ठा करून कार्यालयाची शांती घालण्याचे सत्संगी कार्य मिसाळ यांनी पदभार स्वीकारल्याच्या पहिल्याच दिवशी केले. याबाबतचे वृत्त प्रथम ”महाईन्यूज’‘ने प्रसिध्द केल्यानंतर उभ्या महाराष्ट्रात मिसाळ यांचा हा कारनामा लोकांच्या निदर्शनास आला. शासकीय कार्यालयात पूजाअर्चा, शांती, महाविधी घालण्यास शासकीय बंदी असताना सरकारचा आदेश धाब्यावर बसवून मिसाळ यांनी स्वतःचे वैयक्तीक कार्यालय असल्याचे भासवून त्याठिकाणी हा विधी घातला. त्यामुळे त्यांची पुरती बदनामी झाली असून त्याचा फटका आगामी महापालिका निवडणुकीत पक्षाला बसण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी चर्चा राजकीय वर्तुळात केली जात आहे.
यापूर्वी वायसीएम रुग्णालयातील कोविड सेंटरला भेट दिल्यानंतर भाजपचे नगरसेवक तुषार कामठे पॉझिटिव्ह झाले होते. त्यामुळे आयुक्तांनी लोकप्रतिनिधींना कोविड सेंटरमध्ये प्रवेश करण्यास प्रतिबंध घातले आहेत. आता मिसाळ यांनी या सेंटरला भेट देण्यासाठी प्रशासकीय परवानगी घेतली होती का ?, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. शिवाय, मिसाळ यांच्यावर यापूर्वी -हदय शस्त्रक्रिया केल्याची चर्चा आहे. त्यांच्या जीविताला धोका झाल्यास याची जबाबदारी प्रशासन घेणार का ? असाही प्रश्न आयुक्तांना विचारला जात आहे. तसेच, कोविड सेंटरला भेट देऊन त्याची सोशल मीडियावर ‘ट्रायल’ घेणे म्हणजे कोविड परिस्थितीचा आढावा घेतला, असे दर्शविण्याचा प्रयत्न मिसाळ यांनी केला. यावर ‘नेटिझन्स’नी टिकेची झोड उठविली आहे.
अन्यथा राष्ट्रवादी कॉंग्रेसची बदनामी !
राजू मिसाळ यांची कोविड सेंटरला भेट म्हणजे निव्वळ प्रसिध्दीचा स्टंट आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी कोविड सेंटरला भेट देण्याऐवजी महापौर आणि आयुक्तांसोबत बैठका घेऊन शिघ्र कृती योजना आखण्याची गरज आहे. शहरातील कोरोनाबाधीतांची वाढती रुग्णसंख्या रोखता येत नसल्याचे सत्ताधारी भाजप आणि आयुक्तांचे अपयश समोर असताना याचा पर्दाफार्श करण्याऐवजी मिसाळ यांनी कोविड सेंटरला भेट देऊन सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच, किरकोळ चुका काढणे म्हणजे कोरोना योध्यांचा अपमान आहे. कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी सत्ताधा-यांच्या हातात हात घालून नव्हे, तर त्यांच्यावर दबाव आणून नागरिकांच्या हिताचे निर्णय घेण्यास त्यांना भाग पाडण्यासाठी निर्भिड बाणा दाखविण्याची गरज आहे. या पध्दतीने काम करण्याची चुणूक दाखविली तरच त्यांच्या कर्तबगारीची समाजात आणि पक्षात वाहवा होणार आहे. अन्यथा राष्ट्रवादी कॉंग्रेसची पुरती बदनामी झाल्याशिवाय राहणार नाही, असे निरीक्षण राजकीय जाणकारांनी नोंदवले आहे.





