पुनावळेतील कचरा डेपोच्या विरोधात आयुक्तांना निवेदन
- कचरा डेपोला नागरिकांचा विरोध कायम
- पालिकेने निर्णय रद्द करावा, नगरसेवकांची मागणी
पिंपरी, (महाईन्यूज) – पुनावळे भागात कचरा डेपो सुरू करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून हालचाली सुरू आहेत. कचरा डेपोमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येणार आहे. जर, प्रशासनाने हा निर्णय नागरिकांवर लादला, तर रस्त्यावर उतरून कठोर विरोध करणार, असा इशारा नगरसेवक मयुर पांडुरंग कलाटे यांनी दिला आहे.
- पिंपरी-चिंचवड शहरातील कचरा डेपोला मोशीतील जागा देण्यात आली आहे. परंतु, स्थानिक नागरसेवक आणि नागरिकांचा त्याला विरोध आहे. त्यामुळे हा कचरा डेपो पुनावळे भागात हलविण्याचा निर्णय पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्तांनी घेतला आहे. येथील राज्य सरकारच्या वन विभागाच्या जागेत हा डेपो सुरू करण्याच्या हालचाली होत आहेत. कचरा डेपोमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर होणार आहे. परिसरात दुर्गंधी पसरून नागरिकांना गंभीर आजार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या भागात कचरा डेपो होण्यास स्थानिक नगरसेवक कलाटे यांनी विरोध दर्शविला आहे.
पुनावळे भागाला लागून हिंजवडी आयटी पार्क आहे. त्यामुळे देशभरातून, राज्याच्या कानाकोप-यातून तसेच, देशाबाहेरून नोकरीसाठी आलेले लाखो कामगार या भागात वास्तव्य करत आहेत. हिंजवडी आयटी पार्कपासून अवघ्या काही मिनीटांच्या अंतरावर पुनावळे असल्यामुळे कामगार लोकांची पुनावळे भागाला पसंती आहे. जर, कचरा डेपो या भागात केला तर उद्या या नागरिकांचे आरोग्य धोक्यात येणार आहे. विशेष म्हणजे उच्चभ्रु वसाहतीतील नागरिकांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागणार आहे. परिणामी त्यांचे आरोग्य धोक्यात येणार आहे. त्यामुळे हा कचरा डेपो याठिकाणी होण्यास माझा विरोध आहे. जर, पालिका प्रशासनाने आमच्यावर निर्णय लादला तर रस्त्यावर उतरून विरोध करण्याचा इशारा कलाटे यांनी दिला आहे. यासंदर्भात त्यांनी आयुक्त श्रावण हार्डीकर यांना आज निवेदन दिले आहे.